निधास चषकातील पहिल्याच टी-२० सामन्यात भारताला यजमान श्रीलंकेकडून पराभव स्विकारावा लागला. श्रीलंकेला या सामन्यात विजयासाठी १७५ धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. मात्र पॉवरप्लेच्या षटकांमध्येच शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट यांच्या गोलंदाजीवर हल्ला करत श्रीलंकेने सामन्यात आपली बाजू वरचढ केली. भारतीय गोलंदाजांच्या याच स्वैर माऱ्यामुळे आम्ही सामना सुरुवातीच्या काही षटकांमध्येच गमावल्याची खंत सलामीवीर शिखर धवनने बोलून दाखवली. शिखरने या सामन्यात ९० धावांची आक्रमक खेळी केली.

श्रीलंकेकडून कुशल परेराने भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसं काढली. कुशलच्या फटकेबाजीमुळे श्रीलंकेचे पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ७५ धावांपर्यंत मजल मारली होती. याउलट भारताला आपल्या पॉवरप्लेच्या षटकांत फक्त ४० धावांच करता आल्या होत्या. “पहिली ६ षटकं या सामन्यात आमच्यासाठी निर्णायक ठरली होती. खरतरं आम्ही सामना तिकडेच गमावला होता. दहाव्या षटकानंतर श्रीलंकेचे फलंदाज जास्त मोठे फटके खेळत नव्हते. कारण त्यांनी विजयाची पायाभरणी पहिल्या ६ षटकांमध्ये करुन टाकली होती.” यावेळी शिखर धवनने कुशल परेराच्या फलंदाजीचंही कौतुक केलं.

अवश्य वाचा – निधास चषक २०१८ – पहिल्याच टी-२० सामन्यात भारताचा पराभव, श्रीलंका ५ गडी राखून विजयी

कर्णधार रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनाही फलंदाजीत फारशी चमक दाखवता आली नव्हती. पहिले २ गडी झटपट माघारी परतल्याचाही फलंदाजीवर परिणाम झाल्याचं शिखर धवनने कबुल केलं. शिखर धवन आणि मनिष पांडेचा अपवाद वगळता एकही फलंदाज फारशी चमकदार कामगिरी करु शकला नव्हता. या मालिकेत भारताची पुढची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात झालेला पराभव विसरुन भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.