निदाहास ट्रॉफीच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बांग्लादेशने श्रीलंकेचा पराभव केला. शनिवारी कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळण्यात आलेल्या सामन्याचा हिरो ठरला तो बांग्लादेशचा यष्टीरक्षक आणि फलंदाज मुशफिकुर रहमान. रहमानने ३५ चेंडूत ७२ धावा केल्या. बांग्लादेशला सामना जिंकण्यासाठी २१५ धावांची गरज होती. रहमानच्या धडाकेबाज खेळीने बांग्लादेशने हा सामना दोन चेंडू राखत जिंकला. रहमानला यावेळी सामनावीरचा पुरस्कारही मिळाला.

रहमानने ७२ धावांच्या खेळीत ४ षटकार आणि ५ चौकार लगावले. रहमानच्या आयुष्यात हा दिवस अविस्मरणीय असेल यात काही शंका नाही. आता अविस्मरणीय दिवसाचा जल्लोषही तसाच झाला पाहिजे ना… रहमानने त्याच्या या विजयाचा आनंद मैदानावरच नागिण डान्स करत केला. शेवटची धाव घेतल्यानंतर तो जोशात ओरडायला लागला आणि नंतर त्याने नागिण डान्स केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

शेवटच्या ६ चेंडूत ९ धावांची गरज होती. तिसारा परेरा गोलंदाजी करत असताना मुशफिकुर रहीम फलंदाजी करत होता. त्याने पहिल्या चेंडूत दोन धावा काढला आणि नंतरच्या चेंडूत चौकार लगावला. त्यानंतरच्या चेंडूत त्याने अजून दोन धावा काढल्या. तर चौथ्या चेंडूत एक धावा काढत सामना जिंकला.