सध्या फॉर्मात असलेल्या स्पेनसारख्या बलाढय़ प्रतिस्पध्र्यावर मात करून नायजेरियाला कॉन्फेडरेशन चषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवायचे आहे. पण ‘फिफा’ विश्वचषक आणि युरोपीयन चषक विजेत्या स्पेनसमोर नायजेरियाला त्यासाठी अद्भुत कामगिरी करावी लागणार आहे.
ताहितीवर ६-१ने विजय आणि उरुग्वेकडून १-२ असा पराभव पत्करावा लागल्यामुळे नायजेरियाचे उपांत्य फेरीतील आव्हान धोक्यात आले आहे. त्यातच दर्जेदार फुटबॉलपटूंचा भरणा असलेला स्पेन संघ या सामन्यात विजयासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. ताहितीवर १०-० असा विक्रमी विजय मिळवून स्पेनने आपल्याला वर्चस्वाची झलक दिली आहे. नोव्हेंबर २०११मध्ये इंग्लंडने मैत्रीपूर्ण सामन्यात स्पेनला पराभूत केले होते. त्यानंतर स्पेनने गेल्या २४ सामन्यांत एकही पराभव पत्करलेला नाही. स्पेनने साखळी फेरीतील पहिल्या दोन्ही सामन्यांत विजय मिळवल्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित आहे, पण ब्राझीलविरुद्धची उपांत्य फेरीची लढत टाळण्यासाठी त्यांना नायजेरियावर विजय मिळवावा लागणार आहे.
स्पेनचे बरेचसे खेळाडू फॉर्मात असल्यामुळे कुणाला संधी द्यायची, हा पेच प्रशिक्षक विन्सेंट डेल बॉस्के यांना सोडवावा लागत आहे. उरुग्वेवरील विजयात निर्णायक गोल करणारा रॉबेटरे सोल्डाडो आणि ताहितीवर चार गोल लगावणारा फर्नाडो टोरेस यांच्यात अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. स्पेन संघाला मात्र आक्रमक हल्ले करणाऱ्या नायजेरियाला कमी लेखून चालणार नाही. इडेये ब्राऊन, अहमद मुसा आणि जॉन ओबी मिकेल यांच्यावर नायजेरियाची भिस्त आहे.
रविवारचे सामने
*  स्पेन वि. नायजेरिया
*  उरुग्वे वि. ताहिती
(दोन्ही सामने मध्यरात्री १२.३० वा.पासून सुरू)
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स, ईएसपीएन, ईएसपीएन एचडी.
उपांत्य फेरीचे उरुग्वेचे ध्येय
रेकिफे : दुबळ्या ताहितीविरुद्ध रविवारी मध्यरात्री होणाऱ्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात मोठा विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याचे ध्येय उरुग्वेने बाळगले आहे. नायजेरियावर २-१ असा विजय मिळवणारा उरुग्वे संघ सध्या ‘ब’ गटात तिसऱ्या स्थानावर आहे, पण स्पेनने नायजेरियाला हरवल्यास, दुबळ्या ताहितीवर कोणत्याही फरकाने विजय मिळवणारा उरुग्वे संघ उपांत्य फेरीत आगेकूच करेल, पण नायजेरियाने स्पेनला पराभूत केल्यास, गोलफरकाच्या आधारावर स्पेन, नायजेरिया आणि उरुग्वे यांच्यापैकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. २०१०च्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणाऱ्या उरुग्वेचे दिएगो फोर्लान आणि लुइस सुआरेझ हे दोन्ही आघाडीवर सध्या तुफान फॉर्मात आहेत. कर्णधार दिएगो लुगानो यानेही नायजेरियाविरुद्ध एका गोलाची नोंद केली होती. एडिन्सन कावानी याच्याकडून उरुग्वेला चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्यामुळे ताहितीवर दणदणीत विजय मिळवून उपांत्य फेरीची जय्यत तयारी करण्याचे मनसुबे उरुग्वेने आखले आहेत. १३८व्या क्रमांकावरील ताहितीला या स्पर्धेत गमावण्यासारखे काहीच नाही. दोन्ही सामन्यांत मोठय़ा फरकाने पराभूत व्हावे लागले असले तरी नायजेरियाविरुद्ध झळकावलेला एकमेव गोल त्यांच्या आनंदात भर घालत आहे.