नवी दिल्ली : कनिष्ठ गटातील माजी जागतिक विजेती बॉक्सर निखत झरीन आणि मीना कुमारी देवी यांनी मंगळवारी बल्गेरिया येथील सोफियामध्ये सुरू असलेल्या स्ट्रँडजा स्मृती बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

अनेकदा राष्ट्रीय पदकांवर नाव कोरणाऱ्या झरीनने ५१ किलो वजनी गटातील अंतिम सामन्यात फिलिपिन्सच्या आयरीश मँगो हिच्यावर ५-० अशी सहज सरशी साधली. मीना कुमारी देवी हिने ५४ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत फिलिपिन्सच्याच आयरा विलेगस हिच्यावर ३-२ असा निसटता विजय साकारला. दरम्यान, मंजू राणी (४८ किलो) हिला अंतिम फेरीत फिलिपिन्सच्या जोसी गाबुको हिच्याकडून २-३ असा पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

झरीन हिने आक्रमक खेळ करताना तितकाच भक्कम बचाव करत मँगो हिच्यावर वर्चस्व गाजवले. झरीनने मँगोला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी दिली नाही. मीना कुमारीला गेल्या वेळी याच स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण या वेळी सर्व कसर भरून काढत तिने सुवर्णपदक प्राप्त केले. आक्रमक खेळाला बचावाची जोड देत मीना कुमारीने सुवर्णपदक पटकावले.

दरम्यान पिलाव बासुमतारी (६४ किलो), नीरज (६० किलो) आणि लव्हलिना बोर्गोहेन (६९ किलो) यांना उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.