नवी दिल्ली : पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद याला प्रदर्शनीय सामन्यात उद्योजक निखिल कामत याच्याकडून हार पत्करावी लागल्याने या निकालानंतर सर्वाच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण महान बुद्धिबळपटू आनंदवर मदतनिधी सामन्यात संशयास्पद विजय मिळवताना आपण तंत्रज्ञान आणि इतरांची मदत घेतल्याचे कामतने नंतर स्पष्ट केले.

निकालात फेरफार केल्याप्रकरणी तसेच खेळभावनेचा भंग केल्याप्रकरणी ‘झिरोधा’ कंपनीचे सहसंस्थापक असलेल्या कामतचे चेस.कॉमवरील खाते बंद करण्यात आले. त्यानंतर कामतने ट्विटरद्वारे या आरोपांना उत्तर दिले. ‘‘एका बुद्धिबळ सामन्यात मी महान खेळाडू विश्वनाथन आनंदला पराभूत केले, असा अनेक जण विचार करत आहेत, पण ते हास्यास्पद आहे. हे म्हणजे उसेन बोल्टविरुद्ध १०० मीटरची शर्यत जिंकल्यासारखे आहे,’’ असे कामतने स्पष्ट केले.

तो म्हणाला की, ‘‘लहान असताना आनंदशी चर्चा करण्याचे स्वप्न मी बाळगले होते. मदतनिधी उभारण्याकरिता आनंदशी काही सामने खेळण्याचे भाग्य मला लाभले. आनंदला पराभूत करताना मी संगणक, या खेळातील जाणकार तसेच अन्य गोष्टींची मदत घेतली. मदतनिधी सामना असल्याने फक्त मजा घेणे हा त्यामागील हेतू होता. पण यामुळे निर्माण झालेल्या गोंधळाप्रति मी सर्वाची माफी मागतो.’’

आनंदनेही नंतर ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘‘पटावरील परिस्थितीप्रमाणे मी खेळत गेलो. प्रत्येकानेच तसे अनुकरण करावे, अशी अपेक्षा बाळगतो. लोकांसाठी मदतनिधी उभारण्याकरिता प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. खेळाच्या नीतिमूल्यांचे समर्थन करत हा वेगळाच अनुभव होता.’’

आनंदसारख्या दर्जेदार खेळाडूवर विजय साकारल्यानंतर कामतला समाजमाध्यमांवर चाहत्यांची टीका सहन करावी लागली. ‘‘भारतातील एक गुणी उद्योजक प्रदर्शनीय सामन्यात महान बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदला हरवण्यासाठी चेस इंजिनची मदत घेतो, हे दुर्दैवी आहे. झिरोधा ही कंपनी याच मूल्यांचे पालन करत नसावी, ही अपेक्षा आहे,’’ असे अभिजित सिंगने म्हटले आहे.