महाराष्ट्राच्या राकेश कुलकर्णी व समीर कठमाळे यांच्यासह नऊ खेळाडूंनी श्रीमहेश्वरानंद सरस्वती स्मृती चषक अखिल भारतीय बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त आघाडी घेतली आहे. त्यांचे सातव्या फेरीअखेर प्रत्येकी सहा गुण झाले आहेत.
मनोहर मंगल कार्यालय येथे बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टने आयोजित केलेल्या या स्पर्धेत ए. आर. हरिकृष्ण (तामिळनाडू), हिमांशू शर्मा, राहुल संगमा, सौरव खेर्डेकर (रेल्वे), ए. बालकिशन, एम. एस. तेजकुमार (कर्नाटक) नासिर वजीहा (दिल्ली) यांनी राकेश व समीर यांच्यासमवेत प्रथम स्थान घेतले आहे. स्वप्नील धोपाडे, सुमीतकुमार, अभिषेक केळकर, प्रणव शेट्टी, पंकित मोटा, सोहन फडके व रोशन रंगराजन यांनी प्रत्येकी साडेपाच गुणांसह संयुक्त दुसरे स्थान घेतले आहे.
पाचव्या फेरीत एकटय़ाने आघाडीवर असलेल्या तेजकुमार याची अपराजित्वाची मालिका सहाव्या फेरीत हिमांशु शर्मा याने खंडित केली. हिमांशू याने चुरशीच्या लढतीत त्याला हरविले. सातव्या फेरीत हिमांशूला अभिषेकने बरोबरीत रोखले. रोशन रंगराजन याने स्वप्निल धोपाडे याला बरोबरीत ठेवले. तेजकुमार याने सातव्या फेरीत पुन्हा विजय मिळविताना मनीष जोशी (मध्य प्रदेश) याच्यावर मात केली. देबश्री मुखर्जी याची अनपेक्षित कामगिरीची मालिका कठमाळे याने रोखली. त्याने रंगतदार झालेली ही लढत जिंकली. संगमा याने गुजरातच्या मौलिक रावळ याला पराभूत केले तर राकेश याने आपलाच सहकारी सारंग पोंक्षे याच्यावर मात केली. नासिर याने महाराष्ट्राच्या स्नेहल भोसलेविरुद्ध शानदार विजय मिळविला. खेर्डेकरने सयान बोसवर मात केली. हरिकृष्ण याने दिल्लीच्या ए. के. कलशान याला पराभूत केले.