भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी भारतीय क्रिकेट टीमचा अष्टपैलु खेळाडू हार्दिक पांड्यांची तुलना सर्वश्रेष्ट खेळाडू कपिल देव यांच्याशी केली आहे. पण हार्दिकचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नव्हता. आयपीएलमध्ये मुंबई इंडियनसाठी खेळताना पहिल्यांदा साऱ्यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. आयपीएलमधील त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीने त्याने अनेकांना वेडे करुन सोडले होते.

‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०१८’ मध्ये ‘द ग्रेट इक्वलायझर- स्पोर्ट्स अॅण्ड एज्युकेशन फॉर ऑल’ या चर्चा सत्रात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी हार्दिक आणि क्रृणाल पांड्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा उलगडा केला. नीता म्हणाल्या की, ‘गुजरातमध्ये राहणारे दोन भाऊ ३०० रुपयांसाठी क्रिकेट खेळायचे. त्यांचे बालपण फार गरिबीत गेलं. अनेकदा तर त्यांना उपाशी पोटीच रहावं लागायचं. वेगवेगळ्या जागी क्रिकेट खेळण्यासाठी ही दोन भावंडं ट्रेनमधून तिकिटाशिवाय प्रवास करायची. त्यांच्यातले गूण पाहून आम्ही त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी दिली. त्यांनी या संधीचं सोनं करत सगळ्यांची मनं जिंकली.’

नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ क्रिकेटर हार्दिक पांड्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला. यावेळी पांड्याने लिहिले की, ‘नीता वहिनी, तुम्ही आम्हा दोन भावंडांवर जो विश्वास ठेवला त्यासाठी मनापासून तुमचे आभार.’ यापुढे पांड्या म्हणााल की, ‘मैदानात असो किंवा मैदाना बाहेर, अंबानी कुटुंबाने आम्हाला नेहमीच पाठिंबा दर्शवला आहे. फार कमी वेळात मला यश मिळालं. त्यासाठी मी तुमचे आभार मानतो.’ हार्दिक आणि क्रृणाल यावर्षीही आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळणार आहेत.