नवी दिल्ली : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान न मिळवू शकणाऱ्या अंबाती रायुडूने ‘ट्विटर’वर उपरोधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. परंतु यासंदर्भात कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) बुधवारी स्पष्ट करण्यात आले.

हैदराबादच्या रायुडूऐवजी निवड समितीने अष्टपैलू विजय शंकरला भारतीय संघात स्थान दिले. त्यामुळे नाराज झालेल्या रायुडूने ‘ट्विटर’वर ‘‘विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी नुकताच थ्रीडी चष्मा मागवला आहे’’ असे उपरोधात्मक मत मांडले होते. ‘बीसीसीआय’ने रायुडूच्या प्रतिक्रियेची नोंद घेतली आहे, परंतु निवड प्रक्रियेवर ही थेट टीका नसल्यामुळे त्याच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकणार नाही.

‘‘यावेळी खेळाडू भावनिक झाला असावा. परंतु त्याचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास रायुडूला संधी मिळू शकते,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.