आयपीएल स्पर्धेचे बडतर्फ आयुक्त ललित मोदी यांची चौकशी करताना त्यांच्यावर कोणताही अन्याय झालेला नाही असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने येथे न्यायालयात सांगण्यात आले.
 आयपीएल फ्रँचाईजीबाबात टेंडर निवडसंदर्भात मोदी यांच्याविरुद्ध येथील न्यायालयात खटला सुरू आहे. मोदी यांनी बीसीसीआयच्या चौकशी समितीच्या अहवालास कोणत्याही प्रकारचे आव्हान दिलेले नाही. मात्र आपल्याविरुद्धची चौकशी पक्षपातीपणाने केली आहे अशा आशयाची याचिका मोदी यांनी दाखल केली आहे. त्यास मंडळाच्या वतीने दिलेल्या निवेदनात मोदींवर कोणताही अन्याय झालेला नाही असे सांगण्यात आले आहे. त्यांची चौकशी पारदर्शी पद्धतीने व योग्य रीतीने सुरू असल्याचेही या निवेदनात म्हटले आहे.
मंडळाच्या वतीने काम पाहणारे वरिष्ठ वकील अ‍ॅड. गोपाळ सुब्रमण्यम यांनी सांगितले, मोदी यांनी दिलेल्या याचिकेत मंडळावर गंभीर आरोप केले आहेत. आम्ही न्यायालयास ‘मॅनेज’ केले असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. हे आरोप धांदात खोटे आहेत. जर या आरोपांमध्ये त्यांना तथ्य वाटत असेल तर त्यांनी न्यायालयाच्या कामकाजासच आव्हान द्यायला पाहिजे होते.