भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. पाकिस्तानकडून भारतावर होत असलेले अतिरेकी हल्ले पाहता भारत सरकारने पाकिस्तानसोबत क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीच्या स्पर्धांचा अपवाद वगळता भारत आणि पाकिस्तान हे संघ क्रिकेट सामने खेळत नाहीत. काही दिवसांपूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका पुन्हा सुरु होण्याची गरज असल्याचं मत अनेक माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं होतं. मात्र पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या मते, जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत तोपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका शक्य नाही.

अरब न्यूजशी बोलताना आफ्रिदीने म्हणाला की, ‘पाकिस्तान सरकार भारताशी क्रिकेट खेळण्यास तयार आहे. मात्र भारतामध्ये असलेल्या सरकारमुळे दोन्ही देशात क्रिकेटची कोणतीही आशा नाही आहे. जोपर्यंत मोदी सरकार सत्तेत आहे तोपर्यत भारत-पाकिस्तानमध्ये कोणतीही सीरिज होऊ शकत नाही.’ त्याचप्रमाणे तो असेही म्हणाला की, पाकिस्तानी क्रिकेटर आयपीएल मिस करत आहेत. आयपीएलमध्ये खेळता येत नसल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूचं मोठं नुकसान होतेय.

“IPL हा खूप मोठा आणि लोकप्रिय ब्रँड आहे. ही स्पर्धा म्हणजे नव्या दमाच्या खेळाडूंसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. IPLमध्ये खेळल्याने दडपणाच्या स्थितीत कशाप्रकारे खेळ करावा याची समज येते. तसेच दिग्गज खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर केल्याने अनेक महत्त्वाचे सल्ले मिळतात. पाकिस्तानकडे सध्या बाबर आझमसारखे अनेक नवखे खेळाडू आहेत. IPL न खेळायला मिळाल्याने हे खेळाडू खूप गोष्टींना मुकत आहेत”, असे आफ्रिदी म्हणाला.

“प्रेम हे प्रेम असतं. ते सगळीकडे सारखंच असतं. मी भारतात क्रिकेट खेळणं नेहमीच एन्जॉय केलं. भारतीय क्रिकेटप्रेमींनी मला दिलेल्या प्रेमाचं आणि आदराचं मी नेहमीच कौतुक केलं आहे. आतासुद्धा मी जेव्हा सोशल मीडियावर एखादं मत मांडतो तेव्हा मला अनेक भारतीयांचे मेसेज येतात आणि त्यातील अनेकांना मी रिप्लायही करतो. मला असं वाटतं की माझा भारतातील क्रिकेटबद्दलचा अनुभव अफलातून होता”, असंही आफ्रिदीने नमूद केलं.

श्रीलंकेच्या संघावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे आयसीसीने पाकिस्तानवर क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती. यानंतर पाकचा संघ युएईतील मैदानात खेळत होता. मात्र पाक क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पाठपुरावा करत पाकमधील क्रिकेटबंदी उठवली. यानंतर बांगलादेश, श्रीलंका या संघांनी पाकमध्ये टी-२० आणि कसोटी मालिकाही खेळली. शोएब अख्तरनेही भारत-पाक यांच्यात क्रिकेट मालिका होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दोन देशांमध्ये व्यापार होऊ शकतो, इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने होऊ शकतात तर क्रिकेट सामने खेळण्यास काय हरकत आहे असा सवाल अख्तरने विचारला होता.