आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) द्विसदस्यीय चौकशी समितीने गुरूनाथ मयप्पन आणि एन.श्रीनिवासन यांना क्लीन चीट दिली असली तरी, मुंबईच्या गुन्हे शाखेने ‘प्रकरणाची चौकशी सुरू आहे त्यामुळे आम्ही गुरूनाथ मयप्पनला अजून क्लीन दिलेली नाही’ असे स्पष्ट केले आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणाशी संबंध नसल्याचे अजून सिद्ध झाले नसल्याने गुरूनाथ मयप्पनसोबत एन.श्रीनिवासन यांनाही स्पॉट फिक्सींग प्रकरणाची क्लीन चीट गुन्हे शाखेने दिलेली नाही. कारण, फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन आणि पंच असद रौफ यांच्यादरम्यान आयपीएल संघांच्या महत्त्वाच्या माहितीची देवाण-घेवाण झाल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयच्या द्विसदस्यीय चौकशी समितीने दिल्ली पोलिसांकडून मदत मिळत नसल्याचा आरोप केला होता. यावर गुन्हे शाखेचे अधिकारी म्हणाले, “आम्ही नियामांनुसार जेवढी माहिती देऊ शकत होतो आणि शक्य तेवढी मदत आम्ही पोलिसांना केली आहे. हे न्यायप्रविष्ठ प्रकरण असल्यामुळे आम्हाला प्रकरणाची मिळालेली संपुर्ण माहिती आधी न्यायालयासमोर सादर करावी लागेल. आमची चौकशीही अजून सुरू आहे. त्यामुळे कोणालाही क्लीन चीट देता येणार नाही असेही ते म्हणाले.