इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. याआधी साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला फक्त यजमान इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने केलेल्या फलंदाजीवर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या खेळही स्टोक्सच्या मते रहस्यमय होता.

अवश्य वाचा – World Cup 2019 : …तर भारत नक्कीच जिंकला असता ! धोनीच्या फलंदाजीवर बेन स्टोक्सचं प्रश्नचिन्ह

काही दिवसांनी स्टोक्सने आपण केलेल्या विधानावरुन यू-टर्न घेतला असला तरीही पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझ्झाकने भारतीय संघ विश्वचषकात जाणूनबुजून पराभूत झाल्याचा आरोप केला आहे. “भारताने इंग्लंडविरुद्धचा सामना जाणूनबुजून गमावला यात काही शंकाच नाही. त्या सामन्यादरम्यान जे समालोचन करत होते त्यांनाही असंच काहीसं वाटलं होतं. आयसीसी स्पॉट फिक्सींगवर आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करते. परंतू उपांत्य फेरीत एखाद्या संघाविरोधात खेळायला लागू नये म्हणून पराभूत स्विकारणं या प्रकारालाही शिक्षा झाली पाहिजे. जर तुमचा सर्वोत्तम गोलंदाज योग्य दिशा आणि टप्प्यावर चेंडू टाकत नसेल, विकेट घेण्यासाठी प्रयत्न करत नसेल, समोरच्या फलंदाजाला मोठे फटके खेळता येतील असे चेंडू टाकत असेल…तर हा सर्व प्रकार ठरवून केला जातोय असंच म्हणता येईल.” रझ्झाक पाकिस्तानमधील एका पाकिस्तानी टिव्ही कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

बेन स्टोक्सनेही याआधी धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. “ज्यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यावेळी भारताला ११ षटकांमध्ये ११२ धावा हव्या होत्या. यावेळी धोनी विचीत्र पद्धतीने फलंदाजी करत होता. चौकार-षटकार मारण्याऐवजी एकेरी-दुहेरी धावा घेण्याकडे त्याचा कल अधिक होता. त्या सामन्यात भारतीय संघ अखेरच्या दोन षटकांमध्येही जिंकू शकला असता. धोनी आणि केदार जाधव खेळत असताना, ते जिंकण्यासाठी खेळत आहेत असं अजिबात वाटत नव्हतं. त्यांनी फटकेबाजी करत धावा करण्याचा प्रयत्न केला असता तर भारत नक्कीच सामना जिंकू शकला असता. आमच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वांना असं वाटत होती, की धोनीला शेवटच्या षटकापर्यंत सामना न्यायचा आहे. या सामन्यात धोनी ४२ धावा करत नाबाद राहिला, पण तोपर्यंत सामना भारताच्या हातातून निघून गेला होता.” On Fire या आपल्या पुस्तकात स्टोक्सने विश्वचषकातील भारताविरुद्ध सामन्याबद्दल लिहीलं आहे.

या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माने केलेल्या फलंदाजीबद्दलही स्टोक्सने शंका व्यक्त केली. “या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीपासून आपल्या संघाला बॅकफूटवर ढकललं. आमच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची जराही तसदी त्यांनी घेतली नाही. आम्ही जी रणनिती आखून आलो होतो, ते दोघंही आम्हाला जसं हवं होतं तसंच खेळत होते.” इंग्लंडने या सामन्यात ७ गडी गमावत ३३७ धावा केल्या होत्या, पण भारतीय संघाला हे आव्हान पेलवलं नाही. ज्यामुळे इंग्लंडने ३१ धावांनी हा सामना जिंकला होता. या दरम्यान सोशल मीडियावरही उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होऊ नये व पुढील सामन्यात पाकचं रनरेटचं गणित बिघडावं यासाठी भारत इंग्लंडविरुद्धचा सामना हरला अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती.