केंद्र सरकारने आयपीएलच्या तेराव्या हंगामाला परवानगी दिल्यानंतर सर्व संघ तयारीला लागले आहेत. भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआयने यंदाची स्पर्धा १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात युएईत आयोजित केली आहे. २० ऑगस्टनंतर सर्व खेळाडूंना युएईला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली आहे. RCB संघाचे खेळाडू सध्या बंगळुरुत क्वारंटाइन झालेले आहेत.

४ महिने मैदानाबाहेर असलेल्या खेळाडूंना आता कधी एकदा मैदानात उतरुन सामने खेळतोय असं झालंय. परंतु करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता सर्व नियमांचं पालन करणंही तितकच गरजेचं आहे. बंगळुरुत क्वारंटाइन झालेल्या RCB च्या खेळाडूंनी त्यातल्या त्यातही हॉटेलच्या गॅलरीत सरावाला सुरुवात केली आहे. RCB ने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

युजवेंद्र चहल, नवदीप सैनी व इतर महत्वाचे गोलंदाज बंगळुरुत दाखल झाले आहेत. कर्णधार विराट कोहलीही बंगळुरुत दाखल होणार असून २० तारखेनंतर संघ युएईला रवाना होईल. आयपीएलच्या इतिहासात RCB ची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, त्यामुळे विराटच्या नेतृत्वाखाली RCB चा संघ यंदा चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : दिल्लीकडून खेळताना आश्विनला ‘मंकडिंग’ची परवानगी नाही – रिकी पाँटींग