दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज गोलंदाज डेल स्टेन यांनं वयक्तिक कारणामुळे आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या सत्रात स्टेन खेळताना दिसणार नाही. २०२० मध्ये आरसीबीकडून खेळताना स्टेनची कामगिरी निराशजन झाली होती. त्यामुळे त्याला टीकेचा सामनाही करावा लागला होता.

२०२१ वर्षाच्या सुरुवातीलाच स्टेननं ट्विट करत यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली. आपल्या ट्विटमध्ये स्टेन म्हणाला की, ‘प्रत्येकाला सांगू इच्छितोय यंदाच्या वर्षी आरसीबी किंवा इतर कोणत्याही संघासाठी उपलबद्ध नसणार नाही. काही काळासाठी विश्रांती घेत आहे. निवृत्ती नाही. मला समजून घेतल्याबद्दल आरसीबीचा आभारी आहे.’ आयपीएल वगळता इतर लीगमध्ये खेळणार असल्याचेही स्टेन यानं दुसऱ्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे.

३७ वर्षीय वेगवान गोलंदाज स्टेनला यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता नाही. आरसीबीनं त्याला फक्त तीन सामन्यात संधी दिली होती. यामध्येही तो महागडा ठरला होती. स्टेननं गेल्यावर्षी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर विविध लीगमध्ये तो खेळत आहे. टी-२० आणि एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका संघासाठी तो अद्याप उपलब्ध आहे.

आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णयावर आरसीबीनं ट्विट केलं आहे.