भारतीय संघाच्या आगामी दौऱ्यांमध्ये कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांची साथ सुटण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार कोणत्याही खेळाडूला आपल्या पत्नीला दोन आठवड्यांच्यावर सोबत ठेवता येणार नाही. हा नियम बदलावा यासाठी विराटने बीसीसीआय व क्रिकेट प्रशासकीय समितीला विनंती केली होती. मात्र विराटच्या विनंतीवर इतक्यात निर्णय घेतला जाणार नसल्याचं क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी स्पष्ट केलंय.

अवश्य वाचा – बायकोला सोबत राहू द्या ना! विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती

“होय, विराटची विनंती आमच्यापर्यंत आलेली आहे. मात्र त्यावर लगेच निर्णय घेतला जाणार नाही. बीसीसीआयचे नवीन अधिकारी यावर निर्णय घेतील. सध्या बीसीसीआयचे खेळाडूंच्या पत्नीला सोबत ठेवण्याचे नियम आहेत त्यात कोणतेही बदल होणार नाहीत.” विनोद राय यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर समितीची बाजू स्पष्ट केली. प्रशासकीय समितीने भारतीय संघाचे व्यवस्थापक सुनिल सुब्रमण्यम यांना अधिकृतरित्या पत्र लिहून विनंती करण्यास सांगितलं होतं.

अवश्य वाचा – टीम इंडियाचं Appraisal Time, प्रशासकीय समिती कामगिरीचं मुल्यांकन करणार

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत खेळतो आहे. यानंतर नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. यादरम्यान बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीने विराट कोहलीच्या विनंतीवर काही निर्णय घेतला नाही, तर दोन आठवड्यांच्यावर अनुष्का आणि विराट एकत्र राहू शकणार नाहीत. त्यामुळे आगामी बैठकीत कोहलीच्या विनंतीवर काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – मांसाहार सोडल्यामुळे माझ्या खेळात सुधारणा – विराट कोहली