गुआंझाऊ एव्हरगॅण्डवर ३-० असा विजय
लिओनेल मेस्सीची उणीव भासू न देता लुईस सुआरेझने हॅट्ट्रिकची नोंद करताना बार्सिलोना क्लबला फिफा क्लब विश्वचषक फुटबॉल स्पध्रेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून दिला. गुरुवारी झालेल्या सामन्यात बार्सिलोनाने ३-० अशा फरकाने चीनच्या गुआंझाऊ एव्हरगॅण्डवर दणदणीत विजय मिळवला. अंतिम लढतीत बार्सिलोनासमोर अर्जेटिनाच्या रिव्हर प्लेट क्लबचे आव्हान असेल. रिव्हर प्लेटने १-० अशा फरकाने सॅनफ्रेसेचा पराभव केला. बार्सिलोना तिसऱ्यांदा क्लब विश्वचषक पटकावण्याच्या निर्धाराने रविवारी योकोहामा येथे रिव्हर प्लेटविरुद्ध मैदानात उतरतील.
युरोपियन विजेत्या बार्सिलोनाला उपांत्य फेरीतील लढतीत मेस्सीच्या दुखापतीमुळे जबर धक्का बसला. पोटाच्या विकारामुळे मेस्सीला तो सामना अर्धवट सोडावा लागला होता आणि तो अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यताही कमीच आहे. अशा परिस्थितीत उपांत्य फेरीत मैदानात उतरलेल्या बार्सिलोनाने ३९ व्या मिनिटाला सुआरेझच्या गोलमुळे १-० अशी आघाडी घेतली. मध्यंतराला बार्सिलोनाने १-० अशी आघाडी कायम राखली होती. त्यानंतर ५० व्या आणि ६७ व्या मिनिटाला सुआरेझने गोल करून बार्सिलोनाची सामन्यावरील पकड मजबूत केली. या हॅट्ट्रिकसह सुआरेझने बार्सिलोनाचा ३-० असा विजय पक्का केला.
मेस्सीबाबत प्रश्नचिन्ह
‘‘वैद्यकीय चाचणीच्या अहवालानंतर अंतिम फेरीत मेस्सी खेळणार की नाही हे निश्चित होईल. त्याची प्रकृती ठीक नाही. त्याच्या पोटात वेदना होत आहेत आणि त्याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे उद्यापर्यंत त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची प्रतीक्षा आहे,’’ असे बार्सिलोनाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 2:48 am