सिनीअर खेळाडूंप्रमाणेच भारताच्या १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंसाठी यो-यो टेस्ट अनिवार्य करण्याच्या बीसीसीआयच्या प्रयत्नांना, प्रशिक्षक राहुल द्रविडने खो घातला आहे. मलेशियात होणाऱ्या आशियाई युवा चषक स्पर्धेसाठी पुढील आठवड्यामध्ये भारतीय संघाची निवड होणार आहे. यावेळी खेळाडूंची यो-यो टेस्ट घेण्यास संघ व्यवस्थापन आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विरोध दर्शवला आहे.

१९ वर्षाखालील भारतीय संघासाठीही यो-यो चाचणी ठेवण्याचा विचार बीसीसीआयने केला होता मात्र १९ वर्षाखालील संघाचा प्रशिक्षक असणाऱ्या द्रविडने याला स्पष्ट नकार दिला. या वयात खेळाडूंनी आपला खेळ सुधारण्याकडे जास्त लक्ष द्यायला हवं. एखाद्या खेळाडूचा फिटनेस महत्वाचा आहेच, पण खेळाडू चांगल्या धावा काढत असेल, उत्तमप्रकारे गोलंदाजी करत असेल तर ह्याच निकषांवर त्यांची संघात निवड झाली पाहिजे. अशा शब्दांत भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने आपलं मत नोंदवलं आहे.

भारतीय क्रिकेट संघामध्ये निवड होण्यासाठी सर्वच खेळाडूंना ही चाचणी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये धावण्यापासून, दोरीउड्या आणि इतर साहसी आव्हानांचा समावेश या चाचणीमध्ये असतो. सुरेश रैना, युवराज सिंग यांच्यासारखे खेळाडूही ही चाचणी उत्तीर्ण न होऊ शकल्याने संघात स्थान मिळावू शकले नाही.

कर्णधार, प्रशिक्षक, मुख्य निवड अधिकारी, संघाचे सहाय्यक अधिकारी (ट्रेनर, फिजीओ) यांनी एकत्रितपणे ठरवलेली पात्रता प्रत्येक खेळाडूने सिद्ध करुन दाखवली तरच त्याची निवड संघात केली जाते अशी माहिती बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिली.