महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांच्या जन्मदिनामित्त १५ जुलैला तुळजापूर येथे होणाऱ्या कबड्डी दिनाच्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. मात्र सर्वात प्रतिष्ठेचा असलेला कबड्डीभूषण हा पुरस्कार यंदा कोणालाही देण्यात आलेला नाही.
‘‘कबड्डी क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या कार्यकर्ते व संघटक यांच्याकरिता कबड्डीभूषण पुरस्कार दिला जातो. मात्र यंदा या पुरस्कारासाठी कोणीही आम्हाला योग्य वाटले नाही आणि हा पुरस्कार अन्य कनिष्ठ कार्यकर्त्यांला देऊन आम्ही या पुरस्काराची किंमत कमी करू इच्छित नव्हतो,’’ असे या पुरस्कारासाठी नियुक्त केलेल्या समितीमधील सदस्याने सांगितले.
असोसिएशनने एका पत्रकाद्वारे पुरस्कारविजेत्यांची नावे जाहीर केली. मधू पाटील स्मृती पुरस्कार काशिलिंग आडके (सांगली) तर अरुणा साटम स्मृती पुरस्कार अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर) यांना दिले जाणार आहेत. ज्येष्ठ कार्यकर्त्यांसाठी दिलेल्या पुरस्कारासाठी कन्हय्यालाल सिद्ध (औरंगाबाद), रघुनाथ नलावडे (मुंबई), राजाराम म्हात्रे (ठाणे) व शंकर मोडक (मुंबई उपनगर) यांना जाहीर झाले आहेत. सवरेत्कृष्ट जिल्हा संघासाठी दिलेल्या पारितोषिकासाठी यंदा कोल्हापूर जिल्हा संघटनेची निवड केली आहे.
अन्य पुरस्कार विजेते-
शिष्यवृत्ती धारक खेळाडू : किशोर मुले : नरेश माने, मोनिष पाटील, गजानन ठाकूर, साहिल जाधव. मुली : अक्षदा म्हात्रे, सोनाली हेळवी, पूनम राठोड, सायली शिंदे. कुमार मुले : भरत मालुसरे, अंकुश म्हेत्रे, तुषार पाटील, चेतन थोरात. मुली : सोनाली शिंगटे, रेखा सावंत, श्रद्धा पवार, स्नेहा बिबवे. संघटना विशेष पुरस्कार : नरेश माने व सोनाली हेळवी. पुरुष : रिशांक देवाडिगा. ज्येष्ठ खेळाडू पुरुष : हरिभाऊ रावळे, कविश्वर कोळी, वामन खुरपे. महिला : हेमा गोडसे-नंबियार, माधुरी काळे, अनिता कोठाडिया. ज्येष्ठ पंच : सदानंद माजलकर, सतीश सूर्यवंशी, अजित जोशी, जयप्रकाश म्हात्रे. क्रीडा पत्रकार : शैलेश नागवेकर, माधव शेजवळ, समालोचक : मिलिंद पाटील.