संघावर आलेले दडपण आम्हाला योग्य पद्धतीने हाताळता आले नाही, कारण संघामध्ये संयमाचा अभाव दिसून आला. पण या चुकांमधून आम्ही बोध घेतला आहे. गेल्या सामन्यात जो ‘रिव्हर्स स्विंग’ आमच्यासाठी घातक ठरला होता, त्याचा चांगला अभ्यास केला आहे. त्याचबरोबर आर. अश्विन आणि प्रग्यान ओझा यांचा सामना कसा करायचा याची आखणीही आम्ही केली आहे. हा सामना सचिनबरोबर शिवनारायण चंदरपॉलसाठीही खास असून त्याच्यासाठी आम्ही अथक मेहनत घेत आहोत, असे वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमी म्हणाला. सचिनबद्दल सॅमी म्हणाला की, ‘‘सचिन एक महान खेळाडू आहे. तो क्रिकेटचा सच्चा राजदूत आहे. सचिनचा अखेरचा सामना खेळण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. त्याच्या कारकिर्दीचा शेवट चांगला व्हावा, हीच शुभेच्छा.’’