नवी दिल्ली : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या रंगत आहेत. मात्र सातत्यपूर्ण कामगिरी साकारण्याची भूक कायम असून मी इतक्या लवकर निवृत्त होणार नाही. काही वेळेला प्रोत्साहन मिळणे खडतर जाते, असे छेत्रीने स्पष्ट केले.

३६ वर्षीय छेत्रीने बांगलादेशविरुद्धच्या फिफा विश्वचषकातील पात्रता लढतीत भारताला २-० असा विजय मिळवून दिला. ‘‘मी निवृत्तीचा विचार करत नाही. सध्या मी फुटबॉलचा पुरेपूर आनंद लुटत आहे. पूर्वीपेक्षा मी तंदुरुस्त आहे. वय वाढत असले तरी देशासाठी खेळण्याची आणि गोल करण्याची भूक कायम आहे,’’ असेही त्याने सांगितले.

लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देणार नसल्याचे छेत्रीने नमूद केले. ‘‘अजून किती काळ खेळणार आहेस, असा एकच प्रश्न मला सातत्याने विचारण्यात येत आहे. पण मला त्याची चिंता नाही. फुटबॉलचा आनंद मिळत नाही, असे लक्षात आल्यानंतर लगेचच निवृत्त होईन. वाढत्या वयानुसार माझ्या कामगिरीविषयी मी सजग आहे,’’ असेही छेत्रीने स्पष्ट केले.

अर्जेटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेसीशी तुलना करण्यास त्याने नकार दिला. तो म्हणाला की, ‘‘मेसी आणि त्याच्या दर्जाच्या अन्य खेळाडूंशी माझी तुलना होऊ शकत नाही. माझ्यापेक्षा हजारो चांगले फुटबॉलपटू आहेत. फुटबॉलची जाण असणाऱ्यांना ते ठाऊक आहे.’’