ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर, सुपरमॉम मेरी कोमने सुवर्णपदकाची कमाई केली. वयाच्या ३५ व्या वर्षी मेरी कोमने केलेली कामगिरी ही सर्वांना आश्चर्यचकीत करुन सोडणारी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मेरी कोम बॉक्सिंगला रामराम करणार असल्याच्या अनेक चर्चा रंगत होत्या. मात्र आता मेरी कोमने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

“मी कधीच माझ्या निवृत्तीविषयी बोलले नव्हते. ज्यावेळी माझ्या कानावर निवृत्तीविषयीच्या बातम्या आल्या त्या ऐकून मलाही धक्काच बसला. यात कोणत्याही प्रकारे तथ्य नसून या सर्व अफवा आहेत.” ऑस्ट्रेलियाहून भारतात परत आल्यानंतर मेरी कोमने पत्रकारांशी संवाद साधताना याविषयी माहिती दिली आहे. अजुनही ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई करणं हे आपलं स्वप्न असल्याचं मेरी कोमने यावेळी स्पष्ट केलं.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पीकमध्ये मेरी कोमला वाईल्ड कार्ड एन्ट्री नाकारण्यात आलेली होती. मात्र यानंतर मेरी कोमने हार न मानता, जोमाने तयारी करत राष्ट्रकुल स्पर्धेसाठी स्वतःला पात्र ठरवलं. ऑस्ट्रेलियात मिळालेलं सुवर्णपदक हे मेरीचं राष्ट्रकुल स्पर्धेतलं पहिलंच पदक ठरलं आहे. कोणत्या क्षणी थांबायचं हे मला माहिती आहे. ज्यावेळी शरीर साथ देणार नाही, त्यावेळी मी स्वतः निवृत्तीची घोषणा करेन असं म्हणत मेरी कोमने आपला आगामी स्पर्धांसाठीचा मनसुबा बोलून दाखवला.