देशभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका भारतातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआय आणि इतर महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपल्या सर्व स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयने १५ एप्रलिपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र सध्या देशातली परिस्थिती पाहता, आयपीएलचं भवितव्य अंधारात असल्याचं दिसतंय. यंदाच्या हंगामातली स्पर्धा रद्द करण्याचा पर्याय बीसीसीसआयसमोर असला तरीही, सध्याच्या घडीला सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्याचा कालावधी बीसीसीआय आयपीएलसाठी वापरण्याचा विचार करत आहे. यासाठी आशिया चषक पुढे ढकलण्याच्या पर्यायायवरही बीसीसीआयचे अधिकारी विचार करत असल्याचं समजतंय. मात्र यंदाच्या हंगामातली आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंना सर्वात मोठा फटका बसणार आहे.

“आयपीएलचा हंगाम सुरु होण्याआधी प्रत्येक खेळाडूवर लिलावात बोली लावली जाते. या लिलावात खेळाडूसाठी जी रक्कम ठरवली जाते, ती रक्कम ३ टप्प्यांमध्ये दिली जाते. स्पर्धा सुरु होण्याआधी खेळाडूला १५ टक्के रक्कम दिली जाते, यानंतर ६५ टक्के रक्कम ही स्पर्धेच्या दरम्यान दिली जाते तर उर्वरित २० टक्के रक्कम ही स्पर्धेनंतर दिली जाते. त्यामुळे बीसीसीआयच्या नियमानुसार स्पर्धा झाली नाही तर खेळाडूंना पैसेही मिळणार नाहीत”, आयपीएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली. यंदाच्या हंगामाची आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआय अंदाजे ३ हजार कोटींचं नुकसान होऊ शकतं.

देशभरात करोना वादळामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे. दररोज देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. त्यामुळे या प्रयत्नांना आता कधीपर्यंत यश मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.