भारत-पाक मालिकेवरून टोलवाटोलवी कायम
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या भिजत घोंगडय़ावरून टोलवाटोलवीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. भारताविरुद्धची मालिका भारतात खेळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी घेतली. डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याचा प्रस्ताव बीसीसीआयने दिला आहे. मात्र ही मालिका भारतात होऊ शकत नाही, असे शहरयार यांनी सांगितले. संयुक्त अरब अमिराती येथे पाकिस्तानचे सर्व सामने होतात. येथेच भारताने मालिका खेळावी. संयुक्त अरब अमिरातीत न खेळण्यासाठीचे सयुक्तिक कारण बीसीसीआयने अद्याप दिलेले नाही, असे शहरयार यांनी स्पष्ट केले.
२००७ आणि २०१२ मध्ये आम्ही भारताचा दौरा केला. मात्र आता ते शक्य नाही. आम्ही या मालिकेत यजमान आहोत. पाकिस्तान यजमान असलेल्या सर्व मालिका संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येतात. बीसीसीआयतर्फे आयोजित इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धाही संयुक्त अरब अमिराती येथे झाली होती. मग आता इथे खेळण्यास बीसीसीआयला अडचण काय, असा सवालही शहरयार यांनी केला.
बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात २०१४ मध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार, पाकिस्तानने मालिकेचे यजमानपद भूषवणे अपेक्षित आहे. या मालिकेत दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत. दरम्यान या मालिकेसाठी केवळ महिन्याभराचा कालावधी मिळणार आहे. कारण भारतीय संघ ८ जानेवारीला एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या मालिकेसंदर्भातील अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या संमतीनंतर होईल, तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही त्यांच्या सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे.