रिओ दी जानिरो : आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अध्यक्षपदासाठी माजी फुटबॉलपटू व संघटक झिको यांच्या उमेदवारीला ब्राझील फुटबॉल महासंघाने पाठिंबा दिला आहे. झिको यांना यापूर्वी ब्राझीलकडूनच पाठिंबा मिळाला नव्हता. अर्थात आता ब्राझीलने त्यांना पाठिंबा दिला असला तरीही त्यांना अन्य चार देशांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे.
जर झिको यांना अन्य चार देशांकडून पाठिंबा मिळाला, तर ब्राझील महासंघाकडून त्यांच्या उमेदवारीस पाठिंबा दिला जाईल, असे ब्राझील फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष माकरे पोलो डेल निरो यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
झिको यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संघटनात्मक अनुभव नसला तरी त्यांनी जपान, इराक व भारतामधील काही क्लबच्या मार्गदर्शकपदी काम केले आहे. झिको म्हणाले, ‘‘मी अध्यक्षपदासाठी उभे राहावे असा आग्रह अन्य काही देशांच्या संघटकांनी धरला आहे. त्यामुळेच मी ही निवडणूक लढविण्याचा विचार करीत आहे.’’