२००७ सालचा टी२० विश्वचषक.. पाकिस्तानला चार चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज.. आणि त्या वेळी पाकिस्तानचा कर्णधार मिस्बाह उल हक याने फाईन लेगच्या दिशेने मारलेला स्कूपचा फटका. चेंडू आकाशात उंच गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या श्रीशांतने झेल टिपत पहिल्यावहिल्या टी२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. त्या फटक्यामुळे पाकिस्तान सामना आणि विश्वचषक हरला. पण तरीदेखील तो फटका मारल्याचा पश्चात्ताप होत नाही, असे बेधडकपणे मिस्बाहने सांगितले.

इंग्लंडमध्ये एका कार्यक्रमात क्रिकेट कारकिर्दीतील चढउतार याबाबत बोलताना मिस्बाहला हा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न जरी त्याला अनेकदा विचारण्यात आला असला, तरी त्याबाबत दिलखुलासपणे उत्तर त्याने प्रथमच दिले. तो म्हणाला की त्या स्कूप शॉटबद्दल मला अजिबात पश्चात्ताप होत नाही. त्यावेळी विश्वचषक जिंकण्याची संधी आम्ही गमावली. त्याचे काही दिवस वाई़ट वाटले, हे खरे. पण आयुष्यात पुढे जात राहणे, ही गरज आहे. मी ही तेच केले.

सध्या खेळणाऱ्या खेळाडूंपैकी सर्वोकृष्ट फलंदाज कोण? असाही प्रश्न त्याला या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर विराट कोहली, हाशिम अमला, माईक हसी आणि एबी डिव्हीलियर्स यांची नावे क्षणाचाही विलंब न करता त्याने घेतली.

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला जिंकण्यासाठी ६ चेंडूत १३ धावा हव्या होत्या. स्ट्राईक वर येताच दुसऱ्या चेंडूवर मिस्बाहने षटकार लगावला. त्यामुळे पाकिस्तानचा विजय दृष्टीपथात होता. पण पुढील चेंडूवर स्कूपचा फटका मारून पाकिस्तानने अंतिम गडी, सामना आणि विश्वचषक गमावला.