इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघानेही सरावाला सुरुवात केली आहे. यावर्षी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वातील सीएसकेचा संघ नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. वर्ष २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाल्यापासून चेन्नईच्या संघाने पहिल्यांदाच आपल्या जर्सीत बदल केलाय. पण, या जर्सीमधील एका लोगोवर चेन्नईकडून खेळणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली याने आक्षेप घेतल्याचं वृत्त रविवारी माध्यमांमध्ये आलं. त्यावर आता चेन्नई सुपर किंग्सकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण :-
सीएसकेच्या नवीन जर्सीत एसएनजी १०००० या मद्य उत्पादन कंपनीचाही लोगो आहे. मोईन अली हा इस्लाम धर्माचे पालन करतो, त्यामुळे तो अजिबात मद्यपान करत नाही किंवा प्रचारही करत नाही. त्यामुळे त्याने ही जर्सी परिधान करण्यास नकार दिला आणि लोगो हटवण्याची मागणी केली. त्याची मागणी चेन्नईच्या व्यवस्थापनाने मान्य केली व अखेर लोगो हटवण्यात आला, अशाप्रकारचं वृत्त माध्यमांमध्ये रविवारी प्रसारित झालं होतं. त्यावर वृत्तसंस्था आयएएनएससोबत बोलताना सीएसकेकडून अशाप्रकारची कोणतीही मागणी मोईन अलीकडून करण्यात आली नव्हती, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. रविवारी वृत्तसंस्था आयएएनएसशी बोलताना चेन्नई सुपर किंग्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एस. विश्वनाथन यांनी, मोईनने सीएसकेकडे कोणताही लोगो काढण्याची विनंती केलेली नाही असं स्पष्ट केलं.

कशी आहे नवीन जर्सी? :-
चेन्नईच्या जर्सीचा रंग आधीप्रमाणेच पिवळा आहे, पण खांद्यावर भारतीय लष्कराचा सन्मान म्हणून आर्मीच्या ‘कॅमोफ्लॉज’चा समावेश करण्यात आला आहे. शिवाय फ्रँचायझीच्या ‘लोगो’च्या वरती तीन स्टार आहेत, 2010, 2011 आणि 2018 मध्ये आयपीएलचा खिताब जिंकल्याचं हे तीन स्टार दर्शवतात. “सशस्त्र दलाच्या महत्त्वपूर्ण आणि निःस्वार्थ भूमिकेबद्दल जागरूकता वाढविण्याचा मार्ग आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून शोधत होतो. हा कॅमोफ्लॉज त्यांच्यासाठीच आहे…तेच आपले खरे नायक आहेत”, असं जर्सीत ‘कॅमोफ्लॉज’ ठेवण्याचं कारण असल्याचं विश्वनाथन यांनी यापूर्वी सांगितलं होतं.


दरम्यान, 26 मार्चपासून सीएसकेच्या संघाचा मुंबईत ट्रेनिंग कॅम्प सुरू आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्यांचा आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. 10 एप्रिल रोजी चेन्नई व दिल्ली यांच्यात ही लढत रंगेल.