आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे स्पष्टीकरण

लॉसान : करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसमोर उभ्या राहिलेल्या आव्हानावर कोणताही उपाय नाही, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) स्पष्ट केले आहे.

‘‘करोनासारखी अपवादात्मक परिस्थिती सध्या उद्भवली आहे. त्यावर कोणताही ठोस उपाय नाही. खेळाडूंचे आरोग्य हे ‘आयओसी’साठी महत्त्वाचे आहे,’’ असे ‘आयओसी’च्या प्रवक्त्यांकडून स्पष्ट करण्यात आले. टोक्यो ऑलिम्पिक ठरल्याप्रमाणे जुलैपासून होणार की नाही, यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे.

‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची प्रतिष्ठा राखण्याचे आणि खेळाडूंचे आरोग्य जपण्याचे मुख्य आव्हान आहे. सद्यस्थितीत कोणताही पर्याय सापडत नाही,’’ असे ‘आयओसी’च्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

‘आयओसी’च्या आतापर्यंतच्या धोरणाबाबत ऑलिम्पिक पोल वॉल्ट विजेती कॅटरिना स्टेफॅनिडी हिने नाराजी व्यक्त केली होती. ‘‘आयओसी खेळाडूंच्या आरोग्याशी खेळ करत आहे. चार महिन्यानंतर  होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये नाही तर आतापासूनच खेळाडूंचे आरोग्य धोक्यात घालत आहे,’’ असा आरोप स्टेफॅनिडीने केला होता. जागतिक स्तरावरील अन्य खेळाडूंनीही ‘आयओसी’च्या वेळेत ऑलिम्पिक आयोजनाबाबतच्या प्रयत्नाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाची जबाबदारीही ‘आयओसी’ची

बोस्टन : करोनामुळे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेबाबत अनिश्चिततेचे वातावरण पसरले आहे. मात्र  ऑलिम्पिक स्पर्धेइतक्याच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. कोणताही खेळाडू आधी पात्रता स्पर्धेवर लक्ष केंद्रित करतो. या स्थितीत ज्या खेळांच्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा रद्द होत आहेत किंवा पुढे ढकलण्यात येत आहेत, त्यांची यशस्वीपणे आयोजनाची जबाबदारी ही आमची आहे, असे ‘आयओसीने’ स्पष्ट केले.

भारतीय बॉक्सिंगपटूंच्या ऑलिम्पिक तयारीवर करोनाचा परिणाम नाही

नवी दिल्ली : करोनामुळे यंदाची ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा खेळण्यात येईल की नाही, याबाबत अजून कोणतीच शाश्वती नाही. त्यातच करोनामुळे प्रवासावरही निर्बंध आहेत. त्यामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंच्या तयारीवर परिणाम होणार नाही, असे भारताच्या बॉक्सिंग संघाचे प्रमुख सॅँटियागो निएव्हा यांनी स्पष्ट केले. जॉर्डन येथील आशियाई पात्रता बॉक्सिंग स्पर्धा खेळून नुकताच भारताचा बॉक्सिंग संघ मायदेशी परतला आहे. तेव्हापासून निएव्हा हे स्वत:हून विलगीकरणात आहेत. २७ मार्चपर्यंत ते विलगीकरणात राहणार आहेत. ‘‘विलगीकरणात राहणे हे कंटाळवाणे आहे. आजारी असल्याप्रमाणे मी स्वत:ला भासवत आहे. काळजी घेणे हे सद्यस्थितीत केव्हाही चांगले आहे,’’ असे निएव्हा यांनी सांगितले.