सातत्यपूर्ण फलंदाजीचे दर्शन घडवणाऱ्या युनूस खानने शुक्रवारी शानदार द्विशतक नोंदवले. त्यामुळेच पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीवरील आपली पकड घट्ट केली आहे. तथापि, ऑस्ट्रेलियाला सामना आणि मालिका वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
शेख झायेद स्टेडियमवर युनूसने आपल्या कसोटी कारकीर्दीतील पाचवे द्विशतक साकारताना २१३ धावांची संस्मरणीय खेळी उभारली. त्यामुळे पाकिस्तानने ६ बाद ५७० धावांचा डोंगर उभारून आपला पहिला डाव घोषित केला. यात अझर अली (१०९) आणि कर्णधार मिसबाह उल हक (१०१) यांच्या शतकांचाही समावेश आहे. त्यानंतर दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने ख्रिस रॉजर्सचा बळी गमावून १ बाद २२ धावा केल्या. खेळ थांबला तेव्हा डेव्हिड वॉर्नर आणि नाइट वॉचमन नॅथन लिऑन अनुक्रमे १६ आणि एक धावांवर खेळत होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत युनूस धावांचा महोत्सव साजरा करीत आहे. पहिल्या कसोटीतील दोन्ही डावांत त्याने शतके झळकावली होती. दुसऱ्या कसोटीतसुद्धा आपल्या धडाकेबाज फलंदाजीचा प्रत्यय घडवताना युनूसने साडेआठ तास किल्ला लढवला आणि १५ चौकार व दोन षटकारांसह आपली खेळी फुलवली. युनूसच्या आक्रमणापुढे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजीचा मारा हतबल झाला होता. पीटर सिडलने त्रिफळा उडवून युनिसच्या खेळीपुढे पूर्णविराम दिला. युनूस माघारी परतताना क्रिकेटरसिकांनी त्याला उभे राहून मानवंदना दिली.
युनूसने आपल्या खेळीत १८१ धावा करताना ९३व्या कसोटीत आठ हजार धावांचा टप्पा गाठला. हा टप्पा ओलांडणारा जावेद मियाँदाद (८८३२) आणि इन्झमाम उल हक (८८२९) यांच्यानंतर तिसरा पाकिस्तानी फलंदाज ठरला. याचप्रमाणे आठ हजारी मनसबदारांमधील जगातील २८वा फलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक
पाकिस्तान (पहिला डाव) : १६४ षटकांत ६ बाद ५७० (अझर अली १०९, युनूस खान २१३, मिसबाह उल हक १०१; मिचेल स्टार्क २/८६),
ऑस्ट्रेलिया  (पहिला डाव) : ५.२ षटकांत १ बाद २२ (डेव्हिड वॉर्नर खेळत आहे १६; इम्रान खान १/१८)