इंग्लंडमध्ये आयोजित २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडने भारतावर मात केली आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाहीये. धोनीच्या अनुपस्थितीत भारतीय संघात यष्टीरक्षणाची धुरा ऋषभ पंतकडे आली. पण ऋषभ मिळालेल्या संधीचं सोनं करु शकला नाही, त्यामुळे गेल्या काही काळात धोनीला पुन्हा भारतीय संघात स्थान द्यावं अशी मागणी चाहते करत होते. धोनी मात्र या काळात क्रिकेटपासून दूर राहिला होता. आयपीएलच्या तेराव्या हंगामातून धोनी पुनरागमन करणार होता, परंतू करोनामुळे त्याचं हे पुनरागमन लांबणीवर पडलं.

यंदा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी धोनी भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत होता. परंतू आयसीसीने या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलल्यामुळे धोनीचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पुनरागमनही लांबणीवर पडणार आहे. काही दिवसांपूर्वी धोनीने आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला. २०२१ साली ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विश्वचषकाचं आयोजन होणार आहे, तोपर्यंत धोनीने वयाची चाळीशी गाठलेली असेल. त्यावेळेपर्यंत धोनी आपली फिटनेस लेव्हल कायम राखू शकेल का, हा देखील महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यामुळे धोनी पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानावर दिसणार की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे.

लॉकडाउन काळात धोनी आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत रांची येथील फार्महाऊसवर राहत आहे. सोशल मीडियावर फारसं न येता धोनीने या काळात आपल्या परिवारासोबत वेळ घालवणं पसंत केलंय. याचसोबत तो आपल्या फार्महाऊसमध्ये सेंद्रीय शेतीही करायला लागला आहे. बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन सप्टेंबर-नोव्हेंबर या काळात युएईमध्ये करण्याच्या तयारीत आहे. या स्पर्धेत धोनी चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळणार आहे.