भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन-डे सामन्याला पुन्हा एकदा पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. ४८ व्या षटकात रविंद्र जाडेजा फलंदाजीदरम्यान धावबाद असल्याचं अपील करण्यात आलं. मात्र हे अपील सांघिक अपिल नसल्याने पंच शॉन जॉर्ज यांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र मैदानात लावण्यात आलेल्या तिसऱ्या पंचांच्या टीव्ही स्क्रिनवर जाडेजा धावबाद असल्याचं स्पष्ट दिसत होतं.

हा प्रसंग पाहिल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्ड पंच जॉर्ज यांच्याकडे विचारणा केल्यानंतर, सर्वच विंडीज खेळाडूंनी पंचांवर दबाव टाकला. यानंतर जॉर्ज यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. यानंतर तिसरे पंच रुड टकर यांनी जाडेजा बाद असल्याचं जाहीर केलं. मात्र या संपूर्ण कालावधीत पंच जॉर्ज यांनी घेतलेल्या वेळेमुळे दोन्ही कर्णधारांनी आश्चर्य व्यक्त केलं. भारतीय कर्णधार विराट कोहलीही चौथ्या पंचांशी चर्चा करायला ड्रेसिंग रुममधून बाहेर आल्याचं पहायला मिळाला. या प्रसंगामुळे पंच किती वेळानंतर तिसऱ्या पंचाकडे निर्णयासाठी मदत मागू शकतात या चर्चेला आता जोर धरायला लागला आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : पहिल्याच सामन्यात विराट अपयशी, दांडी गुल करत शेल्डन कोट्रेलने रचला इतिहास

दरम्यान, श्रेयस अय्यर-ऋषभ पंत आणि अखेरच्या षटकांत रविंद्र जाडेजा आणि केदार जाधवने केलेल्या महत्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात २८७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेल्डन कोट्रेलने आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताला दोन दणके दिले. मात्र यानंतर भारतीय फलंदाजांनी संयमी खेळ करत संघाचा डाव सावरला.

अवश्य वाचा – IND vs WI : ऋषभ पंत फॉर्मात परतला, अर्धशतकी खेळीसह धोनीच्या पंगतीत मिळवलं स्थान