पाकिस्तान क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी पाकिस्तानच्या अव्वल माजी क्रिकेटपटूंपैकी कोणीही अर्ज केलेला नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या पदाकरिता परदेशी व्यक्ती निवडण्याचे ठरवले असल्यामुळे कागदी घोडे नाचवण्यात अर्थ नसल्याचे मोहसीन खान, मोईन खान आणि आकिब जावेद या माजी खेळाडूंनी स्पष्ट केले. पीसीबीमधील खात्रीलायक सूत्रानुसार फारसे चर्चेत नसलेल्या दोन माजी खेळांडूनी या पदासाठी अर्ज केला असून त्यामध्ये मंझुर इलाही यांचा समावेश आहे.
‘‘परदेशी प्रशिक्षक निवडण्याचे पीसीबीने आधीच ठरविले आहे. त्यांना पाकिस्तानी प्रशिक्षक निवडायचाच असता तर त्यांनी थेट माझ्याशी चर्चा करायला हवी होती,’’ असे मत आकिब जावेद यांनी व्यक्त केले. त्यामुळे जावेद यांनी या पदाकरिता अर्ज केला नाही. पीसीबीच्या याच मानसिकतेमुळे आपण अर्ज केला नसल्याचे मोहसीन आणि मोईन यांनी सांगितले. यापदासाठी इंग्लंडचे माजी प्रशिक्षक पीटर मूर्स, ऑस्ट्रेलियाचे टॉम मूडी, जेमी सिडन्स, स्टुअर्ट लॉ आणि डी जोन्स, दक्षिण आफ्रिकेचे माईक ऑर्थर यांच्या नावाची चर्चा आहे. दरम्यान आशिया चषक आणि ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत पाकिस्तान संघाच्या पराभवाला शाहिद आफ्रिदी जबाबदार असल्याचे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक वकार युनूस यांनी व्यक्त केले. प्रशिक्षकपदाचा अहवाल त्यांनी बोर्डाला सादर केला.