आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघातर्फे २०१७ मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांपासून झारखंड वंचित राहणार आहे. अव्वल दर्जाच्या या स्पर्धेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांच्या अभावी त्यांना हे सामने आयोजित करता येणार नाही.
झारखंड फुटबॉल संघटनेचे सचिव गुलाम रब्बानी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या स्पर्धेतील काही सामने आयोजित करण्यासाठी आम्ही अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे (एआयएफएफ) प्रस्ताव दिला होता मात्र त्यांनी आमच्याकडे पुरेशा सुविधा नाहीत या कारणास्तव आमचा प्रस्ताव फेटाळला आहे.
किनान स्टेडियम व जेआरडी क्रीडा संकुलात विद्युतप्रकाशाची व्यवस्था नाही. जमशेदपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ नाही यामुळे झारखंडला हे सामने मिळू शकलेले नाहीत. येथे असलेला विमानतळ केवळ टाटा समूहाच्या खासगी विमानवाहतुकीसाठी वापरला जातो. रांची येथे विमानतळ आहे मात्र तेथील स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांचा अभाव आहे.
रब्बानी यांनी पुढे सांगितले, या संदर्भात आम्ही एआयएफएफचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. त्यांनीही येथील मैदाने अव्वल दर्जाची नाहीत व तेथे कृत्रिम मैदानांचा अभाव आहे अशी कारणे देत आमचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही असे सांगितले आहे.