करोना विषाणूचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशभरात २१ दिवसांचं लॉकडाऊन घोषित केलं आहे. या काळात जिवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. या काळात पोलिस यंत्रणा विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तींना लाठीचा प्रसाद देताना आपण सर्वांनी पाहिलंच असेल. मात्र या लॉकडाऊनचा देशातील दिव्यांग व्यक्तींना फटका बसतोय. महत्वाच्या गोष्टी आणण्यासाठी त्यांना बाहेर पडता येत नाहीये.

World Para-Badminton champion स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणाऱ्या मानसी जोशीलाही या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या काळात आमच्यासारख्या लोकांनी जिवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडणं कठीण झालेलं आहे, कोणालाच आमची चिंता नाही…या शब्दांत मानसीने आपली खंत व्यक्त केली आहे.

मानसी सध्या हैदराबादमध्ये पुलेला गोपिचंद यांच्या अकादमीत प्रशिक्षण घेते आहे. ती आगामी टोकियो पॅरालिम्पीक स्पर्धेसाठी तयारी करत होती. मात्र करोना विषाणूमुळे ही स्पर्धा आता वर्षभर पुढे ढकलण्यात आलेली आहे. २०११ साली झालेल्या एका अपघातात मानसीला आपला डावा पाय गमवावा लागला होता. मात्र या सर्व गोष्टींवर मात करुन मानसीने आपला बॅडमिंटनचा सराव सुरु ठेवला. २०१९ साली ऑगस्ट महिन्यात मानसीने World Para-Badminton champion स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.