उत्तर कोरियाने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आगामी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या क्रीडामंत्र्यांनी आज याबाबत माहिती दिली. 1988मधील शीतयुद्धानंतर उत्तर कोरिया प्रथमच ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. टोकियो येथे मागील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा होणार होत्या. परंतु करोनामुळे दुसर्या महायुद्धानंतर त्या प्रथमच पुढे ढकलण्यात आल्या.
”समितीने निर्णय घेतला आहे, की उत्तर कोरिया 32व्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणार नाही. उत्तर कोरियाला करोनाच्या संकटापासून आपल्या खेळाडूंचे रक्षण करायचे आहे”, असे उत्तर कोरियाच्या क्रीडा मंत्रालयाच्या वेबसाइटवर म्हटले गेले आहे.
उत्तर कोरिया ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत व्यावसायिक क्रीडा तंत्रज्ञान कसे विकसित करावे, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके कशी मिळवावी आणि पुढील पाच वर्षांत क्रीडाविषयक उपक्रमांना प्रोत्साहित करणे यासारख्या बाबींवरही चर्चा झाली.
दक्षिण कोरियाच्या एकीकरण मंत्रालयाने मंगळवारी या निर्णयाबद्दल खेद व्यक्त करत म्हटले आहे, की टोकियो ऑलिम्पिक हा दोन कोरिया देशांमधील संबंध सुधारण्याचा एक मार्ग सिद्ध होईल, अशी आशा होती. जपानच्या ऑलिम्पिक समितीने सांगितले, की उत्तर कोरियाने अद्याप त्यांना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणार नसल्याची माहिती दिलेली नाही.
2018मध्ये दक्षिण कोरियामध्ये झालेल्या शीतकालीन ऑलिम्पिकमध्ये उत्तर कोरियाने आपले 22 खेळाडू पाठवले होते. सरकारी अधिकारी, कलाकार, पत्रकार वगळता महिलांच्या ‘चीअरिंग ग्रुप’ मध्ये 230 सदस्य होते.
यावर्षी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान रंगणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 6, 2021 6:39 pm