स्पेनचा खेळाडू कोकेच्या एकमेव गोलच्या जोरावर नॉर्थईस्ट एफसी संघाने इंडियन सुपर लीग स्पर्धेत केरळा ब्लास्टर्स संघावर १-० असा विजय मिळवला. बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या फ्रँचायजी मालकांमध्ये रंगलेल्या लढतीत जॉनच्या संघाने बाजी मारली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत गोलसाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र बचाव अभेद्य असल्याने गोल करण्यात दोन्ही संघांना अपयश आले. हे सत्र गोलविरहित जाणार असे वाटत असतानाच डेव्हिड घाइटने दिलेल्या पासवर कोकेने शिताफीने गोल करत नॉर्थइस्टचे खाते उघडले. कोकेने कोचीचा अनुभवी खेळाडू डेव्हिड जेम्सला चकवत चेंडू गोलपोस्टमध्ये नेला. ३३व्या मिनिटाला दुर्गा बोरोने ३० यार्डावरून केलेला गोलचा प्रयत्न जेम्सने रोखला. तेंडुलकरचा पाठिंबा मिळालेल्या कोची संघाला गोल करण्याची संधी मिळाली होती. मात्र इयन ह्य़ूमने केलेला गोल पंचांनी अवैध ठरवला. दुसऱ्या सत्रात नॉर्थइस्टने कमावलेली आघाडी कायम राखत आक्रमणापेक्षा बचावावर भर देत विजयी सलामी दिली.
आयएसएलमुळे भारतीय फुटबॉलचा चेहरा बदलेल-सचिन
गुवाहाटी : ‘‘इंडियन सुपर लीगची धडाक्यात सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा देशातील फुटबॉलची प्रतिमा बदलवणारी असेल,’’ असे मत मास्टर- ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले. ‘‘ही एक नवी सुरुवात आहे. खेळाडू, चाहते, संघमालक, प्रायोजक या सगळ्यांसाठी हा नवा प्रयोग आहे. सर्वच संघांनी चांगली संघभावना जोपासली आहे. रंगारंग सोहळ्याला मिळालेला प्रतिसाद अफलातून होता. भारतीय फुटबॉलसाठी ही स्पर्धा हा मोठा क्षण आहे. या स्पर्धेने भारतीय फुटबॉलच्या विकासाला चालना मिळणार आहे. या स्पर्धेचा भाग असणे आनंददायी आहे. संपूर्ण देशाने या स्पर्धेला पाठिंबा द्यावा,’’  असे केरळा ब्लास्टर्स संघाचा सहमालक असलेल्या सचिनने सांगितले.