विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने बल्गेरियाचा माजी जगज्जेता व्हेसेलिन टोपालोव्ह याच्यावर तिसऱ्या फेरीत खळबळजनक विजय मिळवून नॉर्वे सुपर बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सलग तीन सामने जिंकून रशियाच्या सर्जी कार्जाकिन याने तीन गुणांसह अव्वल स्थान अबाधित राखले आहे. आनंद आणि लेव्हॉन अरोनियन दोन गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत.
अझरबैजानच्या तैमूर रादजाबोव्ह याला अखेर सूर गवसला असून त्याने नॉर्वेच्या जॉन लुविज हॅमर याचा पराभव केला. स्पर्धेच्या सहा फेऱ्या शिल्लक असून रादजाबोव्हने नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन, अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि रशियाचा पीटर स्विडलर यांच्यासह १.५ गुणांनिशी संयुक्तपणे चौथे स्थान प्राप्त केले आहे. चीनचा वँग हाओ आणि टोपालोव्ह एका गुणासह संयुक्तपणे आठव्या स्थानी आहेत.
आनंदने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना नॅजदॉर्फ सिसिलियन पद्धतीद्वारे डावाची सुरुवात करत नवनवीन चाली रचत टोपालोव्हला प्रारंभीच संकटात टाकले. टोपालोव्हच्या राजाला घेराव घालण्यासाठी आनंदने प्यादा पुढे सरकावला. याच प्याद्यांच्या साहाय्याने आनंदने टोपालोव्हचा घोडा आणि उंट बळकावला. टोपालोव्हच्या चुकीच्या चालींमुळे आनंदने दोन्ही हत्तींसह त्याच्या राजाला घेराव घातला. अखेर ४१व्या चालीअखेर आनंदने हा सामना जिंकला.