07 July 2020

News Flash

दडपणाचा विचार करत नाही- सायना

इंडिया ओपन स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणे हे महत्त्वाचे आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचे अजिबात दडपण नसल्याचे सायना नेहवालने सांगितले. दडपण कायमच असते, मात्र केवळ दडपणाचा विचार करून

| April 23, 2013 03:42 am

इंडिया ओपन स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणे हे महत्त्वाचे आहे, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचे अजिबात दडपण नसल्याचे सायना नेहवालने सांगितले.
दडपण कायमच असते, मात्र केवळ दडपणाचा विचार करून चालत नाही. विशिष्ट स्पर्धेत, विशिष्ट दिवशी मी कशी खेळते हे महत्त्वाचे असे तिने पुढे सांगितले. चीनच्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत सायनाला इंडिया ओपन स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले आहे. सायनाला तुलनेने सोपा ड्रॉ मिळाला आहे. प्राथमिक फेऱ्यांचा अडथळा पार करण्यात सायनाला विशेष अडचण जाणवणार नाही. मात्र उपांत्य फेरीत तिच्यासमोर थायलंडच्या रत्नाचोक इनथॅनॉनचे आव्हान असणार आहे. रत्नाचोकने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत सायनावर विजय मिळवला होता. मात्र प्रत्येक स्पर्धक चांगली असून, सर्वोत्तम प्रदर्शन केले तरच जेतेपदावर कब्जा करता येईल, असे सायनाने स्पष्ट केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील अव्वल खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सामन्याच्या दिवशी तुमचा खेळ कसा होतो यावर सारे काही अवलंबून असते. सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा माझा प्रयत्न असेल असे तिने सांगितले.
सलामीच्या लढतीत सायनाचा मुकाबला इंडोनेशियाच्या बेलाट्रिक्स मनुपूतीशी होणार आहे. मात्र तिला कमी लेखून चालणार नाही, असे सायना आवर्जून सांगते. चीन तसेच जपानच्या खेळाडूही गुणवान आहेत. इनथॅनॉनच्या बाबतीत सांगायचे झाले तर माझ्याविरुद्ध शेवटच्या दोन लढतीत तिने चांगली कामगिरी केली आहे. तिच्या खेळाचे व्हिडीओ काळजीपूर्वक पाहून मला कोर्टवर उतरावे लागेल, असे तिने सांगितले.
यंदाच्या वर्षी माझी कामगिरी चांगली होत आहे. महत्त्वाच्या स्पर्धामध्ये मी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत आहे. माझ्या मते ही चांगली कामगिरी आहे. जेतेपदांवरची चीनची मक्तेदारी मोडणे कठीण आहे. एका स्पर्धेत आपण जेतेपद कमावले तर पुढच्याच स्पर्धेत ते सर्वशक्तिनिशी आपल्यावर आक्रमण करतात. त्यांना सातत्याने नमवणे सोपे नाही. आपल्याला कामगिरीत प्रचंड सातत्य आणावे लागते. एका स्पर्धेत चीनच्या खेळाडू आणि माझ्यातले अंतर कमी झाल्यासारखे वाटते, मात्र पुढच्याच स्पर्धेत हे अंतर पुन्हा रुंदावते.
कौशल्य तसेच खेळाचा विचार करता चीनच्या खेळाडू आणि माझ्यात फार फरक नाही. काही स्पर्धामध्ये ते चांगली कामगिरी करतात. त्यांची तयारी भक्कम असते. त्यांचे एवढे खेळाडू असतात की कोणीतरी तुमच्या विजयात अडथळा ठरतो.
ऑलिम्पिकनंतर गुडघ्याकडे विशेष लक्ष दिले आहे. आता गुडघ्याची स्थिती सुधारली आहे. इंडिया ओपन स्पर्धेत गुडघ्याला संरक्षक कवच न घालता मी खेळेन.
ऑलिम्पिक पदक हे माझे स्वप्न होते. हे स्वप्न साकारले याबाबत मी भाग्यवान आहे. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत मी दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र जेतेपदाने मला हुलकावणी दिली आहे. भविष्यात जेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असेल.
सायना जेतेपदाची दावेदार
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा सोमवारपासून सुरू होत असून, भारताची फुलराणी सायना नेहवाल महिला एकेरीत जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंना आपली छाप पाडण्याची संधी मिळणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर सायना भारतात खेळणार असल्यामुळे स्पर्धेचे मुख्य आकर्षण तीच आहे. पुरुष गटात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला ली चोंग वेईचा खेळ पाहण्यासाठी बॅडमिंटनप्रेमी उत्सुक आहेत. सायना आणि लीने २०११ मध्ये पहिल्या इंडिया ओपनचे जेतेपद पटकावले होते. या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी हे दोघेही उत्सुक आहेत. स्पर्धेचा ड्रॉ लक्षात घेता सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू आमनेसामने येण्याची शक्यता आहे. असे झाल्यास बॅडमिंटनप्रेमींना थरारक सामन्याची पर्वणी मिळू शकते. या स्पर्धेत २२ विविध देशांचे मिळून २०० बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत. पारुपल्ली कश्यप, गुरुसाईदत्त, आनंद पवार, सौरभ वर्मा आणि बी.साईप्रणीथ यांना आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी आहे. महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा-प्रज्ञा गद्रे, ज्वाला गट्टा-प्राजक्ता सावंत, अपर्णा बालन-एन. सिकी या तीन जोडय़ांवर भारताची भिस्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2013 3:42 am

Web Title: not bother about preasure saina nehwal
टॅग Saina Nehwal,Sports
Next Stories
1 सुहास सातवे आसमाँ पर..
2 आनंदला अ‍ॅडम्सकडून पराभवाचा धक्का
3 बार्सिलोनाविरुद्धच्या अग्निपरीक्षेसाठी बायर्न म्युनिच सज्ज
Just Now!
X