देशभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड अशी ओळख असलेल्या बीसीसीआयवरही आर्थिक संकट घोंगावताना दिसत आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला सुमारे ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा रद्द झाल्यास भविष्यकाळात भारतीय खेळाडूंच्या मानधनात कपात केली जाऊ शकते असे संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिले आहेत. ते Mid Day वृत्तपत्राशी बोलत होते.

“आम्हाला पुन्हा एकदा आर्थिक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार आहे. आयपीएलचा यंदाचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होईल, जे खूप मोठं आहे. परंतू आयपीएलचं आयोजन झालं तर कोणतीही समस्या येणार नाही, बीसीसीआय आपलं कारभार सहज चालू शकते.” गांगुली Mid Day वृत्तपत्राशी बोलत होता. यावेळी बोलत असताना गांगुलीने यंदाचा हंगाम रद्द झाल्यास खेळाडूंचं मानधन कापलं जाण्याची शक्यता आहे असेही संकेत दिले आहेत.

यावेळी सौरव गांगुलीने भारतीय संघाच्या प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दलही आपलं मत मांडलं. “एका सामन्याचं आयोजन करण्यापाठीमागे बऱ्याच गोष्टी निगडीत असतात. या पाठीमागच्या खर्चाचा अंदाज सहसा लोकांना येत नाही. सध्या क्रिकेट ऑस्ट्रेलिया बोर्डालाही लॉकडाउनचा फटका बसलाय. त्यामुळे यातून बाहेर येण्यासाठी ते भारतीय संघाच्या दौऱ्यावर अवलंबून आहेत. प्रस्तावित ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेऐवजी भारताने ५ सामन्यांची मालिका खेळावी असा क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा आग्रह आहे, परंतू हे शक्य होणार नाही. यानंतरही भारतीय संघाला मर्यादीत षटकांचं क्रिकेट खेळायचं आहे, त्यातच ऑस्ट्रेलियाला जाताना १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधीही लक्षात घ्यावा लागेल. यामुळे भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळू शकणार नसल्याचं गांगुलीने स्पष्ट केलं.