आयपीएलच्या तेराव्या हंगामाला मिळणाऱ्या स्पॉन्सरशिपचा मुद्दा अखेरीस निकाली निघाला आहे. भारत-चीन यांच्यातील तणावाच्या संघर्षानंतर बीसीसीआयने चिनी मोबाईल कंपनी VIVO सोबतचा करार स्थगित केला. आयपीएलच्या प्रत्येक हंगामासाठी VIVO कंपनी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती. Dream 11 कंपनीने तेराव्या हंगामासाठी २२२ कोटींची बोली लावत स्पॉन्सरशिपचे हक्क विकत घेतले. ४४० कोटींच्या तुलनेत तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयला मिळत असलेली रक्कम ही जवळपास निम्मी आहे. स्पॉन्सरशिपचे हक्क मिळवल्यानंतर गेले काही दिवस Dream 11 कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे. परंतू बीसीसीआयने Dream 11 सोबत आणखी दोन कंपन्यांची स्पॉन्सरशिप घेतली आहे.

अवश्य वाचा – IPL चं आयोजन युएईमध्येच – मुंबई उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब

Education Tech Start-Up Unacademy आणि क्रेडीट कार्ड मॅनेजमेंट कंपनी Cred यांच्याकडून बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी प्रत्येकी ४० कोटी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही ब्रँडकडून मिळणारे ८० कोटी पकडून बीसीसीआयला तेराव्या हंगामासाठी ३०२ कोटींचा निधी मिळणार आहे. VIVO देत असलेल्या रकमेपेक्षा ही किंमत कमी असली तरीही करोनामुळे जगभरात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, सध्या मिळत असलेली स्पॉन्सरशिप चांगली असल्याचंही बीसीसीआयने सांगितलं आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : स्पॉन्सरशिप शर्यतीत आघाडीवर असलेलं Tata Sons मागे का पडलं? जाणून घ्या कारण…

Dream 11 कंपनीत असलेल्या चिनी गुंतवणूकीवरुन सोशल मीडियावर पुन्हा एकदा बीसीसीआयला टीकेचं लक्ष्य केलं जात आहे. पण Dream 11 मध्ये चिनी कंपनीची असणारी गुंतवणूक ही अगदी नगण्य असून कंपनीचे जास्त समभाग हे भारतीय माणसांकडेच आहेत…कंपनीत काम करणारे कर्मचारी व इतर सर्व महत्वाच्या पदांवर भारतीय लोकं काम करत असल्यामुळे Dream 11 ही भारतीय कंपनीच असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये रंगणार आहे.