भारताचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत सध्या आपल्या कारकिर्दीच्या उच्च शिखरावर आहे. श्रीकांतने २०१७ या वर्षात ५ सुपर सिरीज स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला असून, त्यापैकी ४ स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्यात तो यशस्वी झालाय. श्रीकांतने आतापर्यंत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या सुपरसिरीज स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. या धडाकेबाज कामगिरीनंतर आता श्रीकांतला जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान खुणावतं आहे. मात्र याचसोबत श्रीकांतला आपली झोपही तितकीच प्रिय आहे.

अवश्य वाचा – फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासह श्रीकांतने रचला नवा इतिहास

जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी देखील हे स्वप्न बाळगलं आहे, मात्र ते पूर्ण करण्याच्या नादात मी माझ्या झोपेशी तडजोड करणार नाही. माझ्या खेळातून इतरांना जास्तीत जास्त आनंद मिळावा, असा माझा नेहमी प्रयत्न असतो. श्रीकांतने फ्रान्स ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानच्या केंटा निशीमोटोचा २१-१४, २१-१३ असा दोन सरळ सेट्समध्ये पराभव केला. या कामगिरीनंतर जागतिक बॅडमिंटन संघटना गुरुवारी आपली सुधारित क्रमवारी जाहीर करेल, यात श्रीकांतच्या स्थानात सुधारणा झालेली पाहायला मिळेल.

“मी जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाईन की नाही याची मला माहिती नाही. माझ्या क्रमवारीत सुधारणा होईल, ही गोष्ट मी आत्मविश्वासाने सांगू शकतो.” माझ्यासमोर सध्याच्या घडीला कोणतेही विशेष उद्दिष्ट नसल्याचंही श्रीकांत म्हणाला. डेन्मार्कचा व्हिक्टर अॅलेक्सन सर्वंच बाबतीत आपल्यापेक्षा पुढे असल्याचं श्रीकांतने प्रांजळपणे नमूद केलं.

अवश्य वाचा – चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडीत काढत किदम्बी श्रीकांतचा विक्रम

गेल्या काही सामन्यांमध्ये आपल्या कामगिरीबद्दलही श्रीकांतने समाधान व्यक्त केलं. काही सामन्यात मला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून कडवी टक्कर मिळाली. मात्र मी त्यावर मात करण्यात यशस्वी ठरल्याचं श्रीकांत म्हणाला. डेन्मार्क आणि फ्रान्स या स्पर्धांची विजेतेपदं पटावल्यानंतर डिसेंबरमध्ये होणाऱ्या दुबई ओपन स्पर्धेसाठी श्रीकांतला अव्वल मानांकित खेळाडूंच्या यादीत स्थान मिळालेलं आहे. आगामी स्पर्धांसाठी सध्या कशी तयारी करायची हे आपणं ठरवलेलं नाहीये. आपल्या प्रशिक्षकांशी चर्चा केल्यानंतर आपण यावर निर्णय घेऊ, असंही श्रीकांत म्हणाला.