न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला वन-डे मालिकेत चांगलाच धक्का बसला. टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत ३-० ने पराभव स्विकारावा लागला. यानंतर २१ फेब्रुवारीपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळणार नसल्यामुळे मयांक अग्रवालच्या सोबतीला कोणाला संधी मिळणार हा प्रश्न आहे.

अवश्य वाचा – कसोटी मालिकेत शुभमन गिलला संधी मिळायला हवी – हरभजन सिंह

या मालिकेत भारतीय निवड समितीने लोकेश राहुलला कसोटी संघात स्थान दिलेलं नाहीये. यावरुन भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने नाराजी व्यक्त केली आहे. “या दौऱ्यात भारत फक्त दोन कसोटी सामने खेळणार आहे, महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षी भारतीय संघ जास्तीकरुन टी-२० आणि वन-डे सामने खेळणार आहे. मला हाच मुद्दा मांडायचा होता. राहुल सध्या ज्या फॉर्मात आहे, त्याचा वापर भारतीय संघाला करुन घ्यायला हवा होता.” झहीर Cricbuzz संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलत होता.

 

“आपल्याला संधी मिळाल्यावर धावा कशा करायच्या हे त्याला माहिती आहे. सध्या राहुल ज्या फॉर्मात आहे ते पाहता त्याला कसोटी क्रिकेटमध्येही खेळायला आवडलं असतं. कसोटी संघात लोकेश राहुलला स्थान नसल्यामुळे संघाला तोटा आहे…त्याला नाही”, राहुलला स्थान न मिळाल्याबद्दल झहीरने आपली नाराजी बोलून दाखवली.

अवश्य पाहा – Ind vs NZ : एका क्लिकवर जाणून घ्या भारताचा कसोटी संघ…