भारतीय संघाच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मुंबईकर रोहित शर्माला निवड समितीने दुखापतीचं कारण देऊन तिन्ही संघांमधून वगळलं. आयपीएलमध्ये पंजाबविरुद्ध सामन्यात खेळत असताना रोहितला दुखापत झाली होती, यानंतर साखळी फेरीतले काही सामने तो खेळला नाही. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा सराव करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला आणि चाहत्यांमध्ये संभ्रम वाढला. महत्वाच्या खेळाडूला संघात जागा न मिळाल्यामुळे भारतीय चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. टीम इंडियाचे फिजीओ नितीन पटेल यांनी रोहितला दोन ते तीन आठवडे विश्रांतीची गरज असल्याचा अहवाल निवड समितीला दिल्याचंही समोर आलं. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी रोहितला संघात स्थान का मिळालं नाही याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं कारण सांगितलं. संघाच्या निवड प्रक्रीयेत आपण सहभागी नसल्याचं रवी शास्त्री म्हणाले होते.

परंतू भारतीय संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागला या गोष्टीवर विश्वास बसत नाहीये. “रोहित शर्माच्या प्रकरणाबद्दल रवी शास्त्रींना काहीच माहिती नसले या गोष्टीवर माझा विश्वास बसत नाही. निवड प्रक्रियेत त्यांचा सहभाग नसला तरीही निवड समितीने दोन-तीन दिवस आधी रोहितच्या दुखापतीबद्दल त्यांच्याशी चर्चा करुन रवी शास्त्रींचं मत नक्कीच लक्षात घेतलं असणार. जर रोहितला दुखापत झाली असेल तर त्याच्या ऐवजी बदली खेळाडूला संघात घेतलं असतं. हे वर्षच खूप विचीत्र आहे. आता रोहित हैदराबादविरुद्ध सामन्यात खेळला, म्हणजे तो प्ले-ऑफमध्येही खेळणार. तो स्वतः म्हणतोय की मी आता बरा आहे. मग रोहितची संघात निवड का झाली नाही?” Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत सेहवागने आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – …म्हणून सूर्यकुमारला भारतीय संघात जागा नाही ! रवी शास्त्रींनी सांगितलं कारण

रोहितच्या दुखापतीवरुन तयार झालेल्या संभ्रमाबद्दल बोलत असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्याची दुखापत अधिक बळावू नये यासाठी डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. भारताचे सर्वोत्तम खेळाडू मैदानात खेळतील हा बीसीसीआयचा नेहमी प्रयत्न असतो, रोहित भारताचा उप-कर्णधार आहे. मात्र गांगुलीने दिलेल्या प्रतिक्रियेनंतरच रोहित हैदराबादविरुद्ध सामन्यात खेळण्यासाठी सज्ज झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला संघात जागा मिळण्यावरुन तयार झालेला संभ्रम अद्याप कायम आहे.