सध्या माझ्या खेळीबद्दल माध्यमांमध्ये काय लिहीले किंवा बोलले जाते याकडे मी कधीच लक्ष देत नाही. माझे संपूर्ण लक्ष फक्त खेळावर असते असे भारताचा गोलंदाज आर.अश्विनने म्हटले आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेच्या तिसऱया सामन्यात आर.अश्विनची गोलंदाजी जरी मारक ठरली नसली तरी, या सामन्यात अश्विनने फलंदाजीची जबाबदारी पेलत अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे भारतीय संघाला तिसऱा एकदिवसीय सामना बरोबरीत रोखता आला आणि मालिकेतील आव्हानही कायम ठेवता आले.
आर.अश्विन म्हणतो की, मला फलंदाजी क्रमवारीत खेळायला मिळाले हे मी माझे नशीब समजतो. कारण, भारतीय संघ भक्कम फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे गोलंदाजांना फलंदाजी करण्याची शक्यतो वेळ मिळत नाही आणि मिळालीच तरी, कमी षटके मिळतात. संघाचे फलंदाज प्रत्येकवेळी आपली भूमिका निभावत असतात. त्यामुळे चांगली फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही. या सामन्यात मला थांबून सावधखेळी करायची होती आणि त्यादृष्टीने माझे प्रयत्न सुरु होते. त्यामुळेच मला अर्धशतक गाठता आले. तसेच सामनाही बरोबरीत रोखू शकलो.
तसेच लौकिकाला साजेशी गोलंदाजी होत नसल्याबद्दल विचारले असता अश्विन म्हणाला की, मी काही गोष्टींना निर्बंध घातले आहेत. मी माझ्याबद्दल काय लिहीले जाते हे कधीच वाचत नाही किंवा काय बोलले जाते याकडे लक्ष देत नाही. प्रत्येकवेळी मला संघासाठी सर्वोक्तृष्ट कसे देता येईल याकडे माझे संपूर्णपणे लक्ष असते असेही अश्विन म्हणाला.