भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी या दोघांबद्दल बोलायचे झाले, तर दोघांचे स्वभाव पूर्णपणे वेगळे आहेत. पण धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी विराटला मिळण्यासाठी धोनीनेच मदत केली, असे स्वत: विराटने सांगितले होते. काही महिन्यांपूर्वी विराटने आपल्या एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं की मी २०२२पर्यंतच्या क्रिकेटचाच विचार करतो. त्यानंतर विराटनंतर भारताचा कर्णधार कोण? अशी चर्चा रंगली होती, पण विराटच्या अनुपस्थितीत रोहितने संघाचे नेतृत्व केल्याने तोच पुढील कर्णधार असेल असं साऱ्यांचं मत पडलं. पण लिटल मास्टर सुनील गावसकर यांनी वेगळं मत व्यक्त केलं आहे.

“सध्या भारताकडे विराट कोहली, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. पण भारतीय क्रिकेटचं भविष्य पाहता मला असं वाटतं की निवड समिती पुढील कर्णधार म्हणून लोकेश राहुलचा विचार करू शकते. तो नक्कीच भविष्यात भारताचा कर्णधार बनण्यास सक्षम ठरू शकतो. राहुलला यंदाच्या IPLमध्ये पंजाब संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली आहे. ही स्पर्धा राहुलसाठी खूप निर्णायक ठरेल”, असं मत गावसकर यांनी स्पोर्ट्सतकशी बोलताना व्यक्त केलं.

“जबाबदारी दिल्यानंतर स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो हे दाखवण्याची राहुलकडे यंदाच्या IPLमध्ये चांगली संधी आहे. तो स्वत:चे नेतृत्वतकौशल्यदेखील या स्पर्धेत दाखवू शकतो. संघाचे नेतृत्व, खेळाडूंची निवड या सगळ्या गोष्टींचा त्याला फायदा होऊ शकतो. जर त्याने यंदाच्या IPLमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली, तर कदाचित लगेचच त्याला उपकर्णधारपददेखील दिलं जाऊ शकतं”, असेही गावसकर म्हणाले.