विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ २०१९ विश्वचषकाच्या विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात होता. साखळी फेरीपासून धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाची उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडसमोर दाणादाण उडाली. आधीच्या सामन्यांमध्ये खोऱ्याने धावा वसूल करणारे सर्व भारतीय फलंदाज न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात अपयशी ठरले. एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने या स्पर्धेदरम्यान फॉर्मात असलेल्या अंबाती रायुडूला संघात स्थान न दिल्यामुळे बराच वादंग झाला होता. वर्षभरातनंतर निवड समितीचे माजी सदस्य देवांग गांधी यांनी निवड समितीची चूक मान्य केली आहे.

“हो, अंबाती रायुडूची निवड न करणं ही चूक होती. पण आम्हीही माणसंच आहोत. त्यावेळी अंबाती रायुडूला वगळून संघाचा समतोल राखला जाईल असं आम्हाला वाटलं होतं, पण नंतर आमची चूक आम्हाला उमगली. रायुडू संघात असता तर बराच बदल दिसला असता. खरं पहायला गेलं तर विश्वचषकात भारतीय संघासाठी एक दिवस खराब गेला आणि त्याच दिवशी रायुडू संघात नसण्याचा मुद्दा जास्त रंगला. तो अपवाद वगळता भारतीय संघाने विश्वचषकात चांगला खेळ केला. निवड न झाल्यानंतर रायुडूने व्यक्त केलेली नाराजी मी समजू शकतो आणि त्याचं नाराजी ही योग्य होती.” गांधी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

3-D परफॉर्मन्सचं कारण देत प्रसाद यांच्या निवड समितीने रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान दिलं. परंतू शंकरही दुखापतीमुळे स्पर्धा खेळू शकला नाही. यानंतर बदली खेळाडू म्हणूनही निवड समितीने रायुडूचा विचार केला नाही…ज्यामुळे निराश झालेल्या रायुडूने आपली निवृत्ती जाहीर केली होती.