बांगलादेशकडून पराभवाची नामुष्की ओढवल्यावर नवा संघनायक अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वेच्या आव्हानासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना शुक्रवारी खेळवण्यात येणार असून या सामन्यासाठी यजमानांपेक्षा भारतालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.
संघातील अनुभवी खेळाडूंना विश्रांती देण्यात आल्यामुळे युवा खेळाडूंसाठी हा दौरा सुवर्णसंधी असेल. रहाणेबरोबर रॉबिन उथप्पा, केदार जाधव, अंबाती रायुडू, मनीष पांडे आणि मनोज तिवारी या युवा खेळाडूंवर फलंदाजीची जबाबदारी असेल. भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचे सारथ्य करणार असून त्याच्याबरोबर मोहित शर्माला नवीन चेंडू हाताळण्याची संधी मिळेल. मुंबईकर मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीसाठीही ही चांगली संधी असेल. हरभजन सिंगचे एकदिवसीय संघात पुनरागमन झाले असून त्याला डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलची चांगली साथ मिळणार आहे.
झिम्बाब्वेने पाकिस्तान दौऱ्यात दमदार कामगिरी केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा कर्णधार एल्टन चिगुंबुराचा प्रयत्न असेल. डेव्ह व्हॉटमोर यांनी प्रशिक्षकपद सांभाळल्यापासून झिम्बाब्वेची कामगिरी दिवसेंदिवस बहरताना दिसत आहे. चिगुंबुरा, सिकंदर रझा, सीन विल्यम्स, वुसी सिबांडा आणि चामू चिभाभा यांच्यावर झिम्बाब्वेची फलंदाजीची मदार असेल.
संघ – भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजन सिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, संदीप शर्मा आणि मोहित शर्मा.
झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्व्हा (यष्टीरक्षक), चामू चिभाभा, ग्रॅमी क्रेमर, नेव्हिले माडझिव्हा, हॅमिल्टन मसाकाझा, रिचमाँड मुतुम्बामी, टिनाश पानयांगारा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विल्यम्स.
वेळ : दुपारी १२.३० वा. पासून.
प्रक्षेपण : टेन क्रिकेट वाहिनी.

चांगली कामगिरी करून मालिका जिंकायची, हेच आमचे ध्येय आहे.   झिम्बाब्वेचा संघ समतोल असून त्यांच्याकडे गुणवान खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका चांगली रंगतदार होईल. या दौऱ्यात नक्कीच आम्ही गाफील राहणार नाही,  कारण त्यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया साधली होती. त्यामुळे त्यांना कमी लेखण्याची घोडचूक करणार नाही.       
अजिंक्य रहाणे, भारताचा कर्णधार