अनुभवी लसिथ मलिंगाकडे विश्वचषकाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते; पण दुखापतीमुळे तो या स्पर्धेत खेळेल की नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आणि कर्णधारपदाची माळ अँजेलो मॅथ्यूजच्या गळ्यात पडली. याबद्दल विचारले असता मॅथ्यूज म्हणाला की, ‘‘मलिंगा आणि मी विश्वचषकासाठी रणनीती आखत होतो; पण मलिंगा जायबंदी झाला आणि माझ्याकडे नेतृत्व सोपवण्यात आले. मला हे अनपेक्षित होते. माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का होता. मी मानसिकरीत्या यासाठी तयारही नव्हतो; पण देश आणि संघाच्या प्रतिष्ठेसाठी मी कर्णधारपद स्वीकारले.’’

संघाबाबत मॅथ्यूज म्हणाला की, ‘‘विश्वचषकासाठी मला हवा असलेला संघ निवड समितीने दिला आहे. मलिंगा जायबंदी असला तरी तो पहिल्या सामन्यापासून आमच्या ताफ्यात असेल. आशिया चषकापेक्षा कामगिरी निश्चित  चांगली होईल.’’

सर्व संघांनाच संधी – दिलशान

भारतीय संघाला प्रबळ दावेदार म्हटले जात आहे, पण गेल्या विश्वचषकातही त्यांच्याबाबतीत असेच म्हटले गेले होते आणि आम्ही जेतेपद पटकावले होते. त्यामुळे विश्वचषकात सर्व संघांनाच जेतेपदाची संधी असेल, असे श्रीलंकेचा सलामीवीर तिलकरत्ने दिलशानने सांगितले.

संघात चांगला समन्वय – चंडिमल

संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. भारतातील मालिका आणि आशिया चषक स्पर्धेत आम्हाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही; पण या सामन्यांतील पराभवातून आम्ही बरेच काही शिकलो आहोत आणि याचा फायदा विश्वचषकात नक्कीच होईल, असे दिनेश चंडिमल म्हणाला.

माझ्यासाठी अनुभव महत्त्वाचा – सिरीवर्धना

हा माझा पहिलाच विश्वचषक आहे. त्यामुळे माझ्यासाठी या विश्वचषकातील अनुभव फार महत्त्वाचा असेल. आतापर्यंत परिस्थितीनुसार मी संघासाठी खेळत आलो आहे आणि यापुढेही माझा हाच प्रयत्न असेल., असे मिलिंडा सिरीवर्धनेने सांगितले.