न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध भारताने दिमाखदार यश मिळवले असले तरी बांगलादेशला कमी लेखणार नाही, असे मत यष्टिरक्षक वृद्धिमान साहाने व्यक्त केले आहे. भारत-बांगलादेश यांच्यात एकमेव कसोटी सामना ९ फेब्रुवारीपासून हैदराबादला सुरू होणार आहे.

‘‘जागतिक क्रमवारीचा विचार केल्यास भारतासाठी हे प्रतिस्पर्धी आव्हान देणारे नसतील. मात्र मैदानावर जाण्यापूर्वीच आम्ही त्यांना कमी लेखणार नाही. सामन्याच्या दिवशीच्या परिस्थितीवरच ते अवलंबून असून, त्यानुसारच आम्ही ती हाताळू,’’ असे साहाने सांगितले.

भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत ३-० असे निभ्रेळ यश मिळवले, मग इंग्लंडविरुद्धची मालिका ४-० अशा फरकाने जिंकली. मात्र बांगलादेशविरुद्ध आमची नव्याने सुरुवात असेल, असे साहाने सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘प्रत्येकाला मैदानावर अप्रतिम कामगिरी करायची इच्छा असते. तुमच्या विचारांचे उत्तम कामगिरीत रूपांतरण करण्याची आवश्यकता असते.’’

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीनंतर भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातील पहिली कसोटी २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होत आहे. याबाबत तो म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेचा सध्या तरी विचार केलेला नाही, या क्षणी बांगलादेश कसोटीकडे लक्ष केंद्रित केले आहे.’’

इराणी करंडक सामन्यात साहाने नाबाद २०३ धावांची खेळी साकारून शेष भारताला विजेतेपद मिळवून दिले होते. याचप्रमाणे पूर्व विभागाच्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत साहाने बंगालला गटात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे.

‘‘ट्वेन्टी-२० प्रकारात सातत्य टिकवणे आव्हानात्मक असते. मात्र गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत आपली कामगिरी सर्वोत्तम होत आहे,’’ असे साहाने सांगितले.