महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर, संघाचं नेतृत्व विराट कोहलीकडे आलं. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अद्याप आयसीसीच्या एकाही महत्वाच्या स्पर्धेचं विजेतेपद विराटला मिळवता आलेलं नाही. विराटच्या अनुपस्थितीत मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करतो. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते कर्णधारपदाच्या बाबतीत रोहित शर्मा हा भारतीय संघाचा दुसरा धोनी आहे. रैना एका पॉडकास्टमध्ये बोलत होता.

“मी असं म्हणेन रोहित शर्मा भारतीय संघाचा दुसरा महेंद्रसिंह धोनी आहे. मी त्याला मैदानावर पाहिलं आहे. तो शांत असतो, प्रत्येकवेळी तो आपल्या सहकाऱ्यांची मत विचारात घेतो. नवीन खेळाडूंना आत्मविश्वास देण्यापासून खडतर काळात संघाचं नेतृत्व करणं हे सर्व गूण त्याच्यात आहेत. ज्यावेळी कर्णधार मैदानात अशी चांगली कामगिरी करत असतो साहजिकच संघावर आणि ड्रेसिंग रुममध्ये त्यांचा चांगलाच परिणाम होतो.” दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाजी ड्युमिनीच्या पॉडकास्टमध्ये बोलत होता.

संघातला प्रत्येक खेळाडू हा कर्णधार आहे असा रोहितचा पवित्रा असतो. मी आशिया चषकात त्याच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंना आत्मविश्वास देताना मी त्याला पाहिलं आहे. ज्यावेळी कर्णधार तुमच्या सर्व गोष्टी ऐकत असतो त्यावेळी साहजिकत समोरच्या खेळाडूलाही चांगलं वाटतं, रैनाने रोहितच्या कर्णधारपदाच्या शैलीचं कौतुक केलं. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधीत्व करत असताना रोहित शर्माची कामगिरी ही सर्वोत्तम आहे.