ऑलिम्पिक पदकविजेत्या साक्षी मलिकसह तीन कुस्तीपटूंना भारतीय कुस्ती महासंघाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. परवानगीशिवाय राष्ट्रीय शिबीर सोडल्याचा ठपका ठेवत २५ कुस्तीपटूंची हकालपट्टी करण्यात आली आहे.

लखनौमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात प्रशिक्षण घेणाऱ्या ५४ पैकी २५ महिला कुस्तीपटूंनी संघटनेची परवानगी घेतल्याशिवाय राष्ट्रीय शिबीर सोडण्याची चूक केली. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. यात जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या साक्षी (६२ किलो), सीमा बिस्ला (५० किलो) आणि किरण (७६ किलो) यांचाही समावेश आहे. या तीन खेळाडूंना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी बुधवापर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अन्य २२ कुस्तीपटूंना पुढील सूचना मिळेपर्यंत राष्ट्रीय शिबीर सोडण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी झालेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठीच्या बिगर ऑलिम्पिक गटाच्या निवड चाचणी स्पर्धेतही या २५ खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती.

पूजा आणि नवज्योत भारतीय संघात

जागतिक कुस्ती स्पर्धा

लखनौ येथे सोमवारी झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत आव्हान देण्यासाठी कुणीही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे कुस्तीपटू पूजा धांडा आणि नवज्योत कौर यांना जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवता आले आहे. परंतु या दोघींनाही ऑलिम्पिक वजनी गटातून पात्रता साधता आलेली नाही. चार बिगरऑलिम्पिक वजनी गटांसाठी सोमवारी झालेल्या निवड चाचणीद्वारे पूजा ५९ किलो आणि नवज्योत ६५ किलो गटातून पात्र झाल्या आहेत. या दोघींच्याही वजनी गटात स्पर्धकच नव्हते. कारण भारतीय कुस्ती महासंघाने २५ खेळाडूंवर शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे. यापैकी सात खेळाडू या चाचणीत सहभागी होणार होते.

भारतीय महिला संघ

सीमा बिस्ला (५० किलो), विनेश फोगट (५३ किलो), ललिता (५५ किलो), सरिता मोर (५७ किलो), पूजा धांडा (५९ किलो), साक्षी मलिक (६२ किलो), नवज्योत कौर (६५ किलो), दिव्या काक्रान (६८ किलो), कोमल (७२ किलो), किरण (७६ किलो).